पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद; अर्जासाठी ३० जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/ वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दि. २० मे २०२५ पासून सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची २६ जूनपर्यंत मुदत होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची मुदतवाढ दि. ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुढील संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. दि. २६ जून २०२५ रोजी संध्याकाळपर्यंत तब्बल १ लाख ५० हजार ६८४ विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज नोंदणी केलेली आहे, तर त्यापैकी १ लाख ३० हजार ८८५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले.
या वर्षी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशाच्या चार फेऱ्या घेण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी पहिला विकल्प, दुसऱ्या फेरीसाठी पहिले तीन विकल्प, तिसऱ्या फेरीसाठी पहिले सहा विकल्प तर चौथ्या फेरीसाठी सर्व विकल्प अनिवार्य असणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी विकल्प अर्ज भरुन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
संचालनालयाने पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले.