
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात रेल्वे सेवेचे जाळे विस्तारले जात आहे. विदर्भ, छत्तीसगड तेलंगणा, जालना-जळगाव कनेक्टिव्हिटी असे विविध प्रकल्प हाती घेतले असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आणखी २३८ एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिली. तसेच महाराष्ट्रातील १३२ स्थानकांचा कायापालट होणार असून महाराष्ट्रातील गडकिल्ले व ऐतिहासिक ठिकाणांना जोडण्यासाठी रेल्वेची ‘आयकॉन टूर’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईत ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ‘वेव्हज् समिट २०२५’च्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह विविध ऑडिटोरियम्सची पाहणी केली. या पाहणीनंतर घेतलेल्या एकत्र पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या.
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तब्बल १ लाख ७३ हजार ८०४ कोटींची तरतूद केली असून मुंबई व लगतच्या परिसरात १७ हजार कोटींची रेल्वेची कामे सुरू आहेत, असे वैष्णव यांनी सांगितले.
मुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत. यावर्षी जवळपास २४ हजार कोटी राज्याला मिळाले आहेत. राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ सुरू करण्यात येणार असून या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. ‘सर्किट ट्रेन’ने १० दिवस प्रवास करता येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रासाठी केंद्र सरकार २३ ते २५ हजार कोटी रुपये देते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने गेल्या १० वर्षांत एकत्रित १० हजार कोटी रुपयेही आणले नाहीत, असा टोला फडणवीस यांनी यावेळी मविआला लगावला.
विदर्भातील गोंदिया ते बल्हारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल ४,८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्र प्रदेशाशी व्यापार-व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
पावसाळ्यातही रेल्वे सुरळीत धावणार
पावसाळ्यात रेल्वे लाइनवर पाणी साठल्याने रेल्वे धावण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होतो. मात्र, रेल्वेलाइनवर दीड फूटपेक्षा अधिक पाणी असेल तरीही आगामी काळात रेल्वे सुरूच राहणार असल्याची माहितीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
भारत ‘क्रिएटिव्ह एंटरटेन्मेंट इकॉनॉमी'चे नेतृत्व करणार
मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट’च्या (वेव्हज् २०२५) निमित्ताने क्रिएटिव्ह एंटरटेन्मेंट क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा इव्हेंट होणार आहे. जागतिक दर्जाच्या या परिषदेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला असून यामुळे जगातील ‘क्रिएटिव्ह एंटरटेन्मेंट’ क्षेत्र मुंबईकडे आकर्षित होणार आहे. त्यामुळे भविष्यात 'क्रिएटिव्ह एंटरटेन्मेंट इकॉनॉमी'चे नेतृत्व भारत करेल, असा दृढविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यात जगभरातील १०० देशांचे प्रतिनिधी उपस्थित असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मविआने १० वर्षांत एकत्रित १० हजार कोटीही आणले नाहीत - फडणवीस
राज्यातील १३२ रेल्वे स्थानके होणार ‘वर्ल्ड क्लास’
महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून ती जागतिक दर्जाची करण्यात येणार आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महत्त्वाची रेल्वे स्थानके ‘वर्ल्ड क्लास’ दर्जाची होणार आहेत.
१७ हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची सध्या कामे सुरू आहेत.
३०० किमी नवीन रेल्वे मार्गांची कामे प्रगतिपथावर.
रेल्वे मार्गावरील गर्दी नियंत्रणात.
उत्तम तंत्रज्ञानाचा वापर
उपनगरी रेल्वेसाठी खास डिझाइन केलेली सुरक्षा व सिग्नलिंग प्रणाली
मुंबईत स्थापन होणार पहिले भारतीय क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट.
लवकरच ‘कवच ५.०’ प्रणाली बसवणार
भारताला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचे लक्ष्य.
मुंबई वन कार्ड - एकीकृत परिवहन : एकाच कार्डद्वारे लोकल, मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बस आदींमध्ये प्रवास करता येणार.