
भाईंदर : भाईंदर पश्चिम खाडी किनारी बंदोबस्तासाठी तैनात असलेला महाराष्ट्र सुरक्षा दलाचा रमेश पाटील नावाचा जवान रविवारी खाडीत बुडाल्याची घटना घडली आहे.
भाईंदर पश्चिम खाडी किनारी कांदळवन संरक्षणासाठी शासनाच्या वन विभागामार्फत महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान रमेश पाटील यांना नेमण्यात आले होते. या ठिकाणी वनविभागाची चौकी आहे. रविवारी साडेतीन ते चारच्या सुमारास येथील जेट्टीवरून खाडीत पाटील हे पोहण्यासाठी उतरले असता बुडाल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. पाटील यांनी खाडीत उडी मारली असता पाण्याचा वेग प्रचंड असल्याने ते बुडून वाहून गेल्याचे सांगितले, जात असले तरी पाटील हे जेट्टीवरून खाली पडल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
या घटनेनंतर महापालिकेचे अग्निशमन दल व स्थानिक मच्छीमारांनी मिळून खाडीत पाटील यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने ते वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.