
येत्या २२ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पाडवा मेळाव्यात भाषण करणार आहेत. संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या भाषणाकडे लागले आहे. अशामध्ये आज त्यांच्या उपस्थितीत बहुप्रतिष्टित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित करण्यात आला. येत्या २८ मार्चला हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. मात्र यावेळी राज ठाकरे मुंबईमध्ये नसून बाहेरगावी जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, "चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी हजर राहू शकणार नाही, सध्या आपली अवस्था ही दहावी नापास विद्यार्थ्यांसारखी झाली आहे," असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले की, "२८ तारखेला चित्रपट प्रदर्शित होत असून मी यावेळी हजर राहू शकणार नाही. आमची अवस्था सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखी झाली आहे. आमच्या निवडणुका नेमक्या कधी लागणार? मार्च की ऑक्टोबर? असे सध्या सुरु आहे. त्यामुळे सध्या मला दहावी नापास झाल्यासारखेच वाटत आहे." असे आपले मत त्यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, "गेली ४ - ५ वर्षे मी कुठेच बाहेरगावी गेलेलो नाही. नातवालाही बाहेर घेऊन जायचं आहे. सध्यातरी निवडणूक मला वातावरणात काही दिसत नाही. थोडी गॅप मिळाली आहे तर बाहेरगावी जाऊन येतो," असे त्यांनी स्पष्ट केले.