एसटीच्या जागांवरील अतिक्रमण हटवा; परिवहन मंत्री सरनाईक यांचे निर्देश, मुंबईतील ४ मोक्याच्या जागी झोपडपट्ट्या

परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या ४३ जागांपैकी मुंबईतील ४ मोक्याच्या जागा झोपडीधारकांनी बळकावल्या आहेत. असे असताना १५ ठिकाणी परिवहन कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. भविष्यात उर्वरित जागा गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
एसटीच्या जागांवरील अतिक्रमण हटवा; परिवहन मंत्री सरनाईक यांचे निर्देश, मुंबईतील ४ मोक्याच्या जागी झोपडपट्ट्या
Published on

मुंबई : परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या ४३ जागांपैकी मुंबईतील ४ मोक्याच्या जागा झोपडीधारकांनी बळकावल्या आहेत. असे असताना १५ ठिकाणी परिवहन कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. भविष्यात उर्वरित जागा गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई नगर येथील ७ एकर जमीन, वडाळा, जुहू व अंधेरी येथील जमिनी अनधिकृतरीत्या अतिक्रमण करून झोपडपट्टीधारकांनी गिळंकृत केल्या आहेत. याकडे गेले कित्येक वर्षांमध्ये परिवहन विभागाचे लक्ष गेले नाही. मात्र यापुढे अशाप्रकारे जमिनी हडप केल्या जाऊ नयेत. यासाठी परिवहन विभागाने कुंपण घालून घ्यावे व लवकरात लवकर सदर जमिनींचा विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले.

ते म्हणाले की, भविष्यात महसूल वाढीसाठी या जागांचा पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यामध्ये पुढील ५० वर्षांचा विचार करून परिवहन विभागासाठी आवश्यक असलेली कार्यालये, टेस्टिंग ट्रॅक व इतर सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले.

मोटार परिवहन विभागाकडे ४३ जागा आहेत. यांची माहिती अद्यावत करून या जागांची सद्यस्थिती, जागेचा ७/१२, ८- अ यासह अन्य अनुषंगिक कागदपत्रे तयार करून याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयास सादर करून जिथे अतिक्रमण झाले आहे, त्या ठिकाणी ते दूर करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

२० जूनच्या बैठकीत अंतिम निर्णय

परिवहन विभागाच्या स्वमालकीच्या जागांची संबधित अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. त्यासाठी विभागाकडील जागांची माहिती संकलन व अन्य बाबींसाठी समिती गठित करून प्रत्येक जागेची स्वतंत्र नस्ती तयार करावी. तसेच या अनुषंगाने मोटार परिवहन विभागाकडील स्वतःच्या जागेसंदर्भात सर्वंकष माहिती ठेवण्यासाठी पुढील १५ दिवसांत इस्टेट ऑफिसर व कायदा सल्लागार नेमण्याबाबत कार्यवाही करावी. २० जूनपर्यंत जमिनीविषयक सर्व कागदपत्रे तपासून त्याचे प्रमाणीकरण करण्यात यावे, जेणेकरून या जमिनीच्या विकासासंदर्भात अंतिम निर्णय घेता येईल, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in