मुंबई : १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत विकसित महाराष्ट्र २०४७ हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारच्या सगळ्या विभागांनी व्हिजन डॉक्युमेंट तयार करणे गरजेचे आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २०४७ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
विकसित महाराष्ट्र २०४७अंतर्गत याआधी १०० दिवसांचा कार्यक्रम आखून देण्यात आला होता. १०० दिवसांच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा २ ऑक्टोबर रोजी सत्कार करण्यात येणार आहे.
१४ जणांची समिती
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केलेल्या '१५० दिवसांचा कार्यक्रम' यास अनुसरून विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याबाबत सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची टास्क फोर्स तयार करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली १४ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.