महाराष्ट्र घेणार गुजरातकडून धडे;गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची मुनगंटीवार, सामंत यांनी घेतली भेट

२० अब्ज डॉलर्सचा प्रकल्प हातातून निसटल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला धक्का बसला.
महाराष्ट्र घेणार गुजरातकडून धडे;गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची मुनगंटीवार, सामंत यांनी घेतली भेट

वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. आता सेमीकंडक्टरचे धोरण कसे तयार करायचे आणि प्रोत्साहन योजनांबाबतचे धडे महाराष्ट्र गुजरातकडून शिकणार आहे. यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

२० अब्ज डॉलर्सचा प्रकल्प हातातून निसटल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला धक्का बसला. त्यापासून धडे घेण्याचे या सरकारने ठरवले आहे. त्यासाठी भाजपच्या अन्य राज्यात सेमीकंडक्टर धोरण निर्मिती, डिजीटल मिशन, ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी कशी केली जाते याचा अभ्यास केला जात आहे.

मुनगंटीवार व सामंत यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी राज्य सरकारच्या विविध धोरणांबाबत प्रदीर्घ चर्चा केली. वेदांत ग्रूपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रातही गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार व सामंत यांचा दौरा महत्वपूर्ण आहे. तळेगाव येथे ही गुंतवणूक अपेक्षित आहे. एमआयडीसीने यासाठी ११०० एकरचा भूखंड राखीव ठेवला आहे.गुजरातने २०२२-२७ दरम्यान गुजरात सेमीकंडक्टर धोरण तयार केले आहे. या धोरणाबाबत दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्री पटेल यांच्याशी चर्चा केली. या धोरणातून किमान २ लाख नवीन रोजगार निर्माण होतील, असे लक्ष्य ठेवले आहे. तसेच धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजनमध्ये ‘सेमीकॉन सिटी’ उभारली जाणार आहे.

राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुजरात सरकारच्या आयटीशी संबंधित २०२२ ते २०२७ पर्यंत धोरण तयार आहे. राज्य सरकार त्याचा अभ्यास करून नवीन धोरण तयार करेल. तसेच जैवतंत्रज्ञान धोरण, नवीन औद्योगिक धोरण-२०२०, इलेक्ट्रॉनिक धोरण, स्टार्ट अप धोरण आदींचा अभ्यास करेल. गुजरातच्या सर्व महापालिका व नगरपरिषदांमध्ये ‘ई-गव्हर्नन्स’ वापरले जाते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in