आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

जगात २८ हून अधिक देशांमध्ये मनुष्यबळाची मोठी मागणी असून, महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Published on: 

मुंबई : देशाच्या युवा शक्तीला रोजगारक्षम बनवण्यासाठी शिक्षणासोबत कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणे आवश्यक आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून बदलत्या तंत्रज्ञानानुसार (एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग) सातत्याने 'अपस्किलिंग' आणि कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे. जगात २८ हून अधिक देशांमध्ये मनुष्यबळाची मोठी मागणी असून, महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 'पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यात' ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाव्दारे रोजगार मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री यांच्या हस्ते सहीदा परमाणिक यांना क्रेवा कॅपीटल सर्व्हिसेस प्रायवेट लिमीटेड बेलापूर व कांती शंभू चव्हाण यांना क्रेवा कॅपीटल सर्व्हिसेस प्रायवेट लिमीटेड कुर्ला येथील या कपंनीकडून नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. हेमलता बागला, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.

कोकण व नाशिक विभागात ४०० पेक्षा जास्त मेळावे

कोकण व नाशिक विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. आतापर्यंत १५०० पेक्षा अधिक उद्योजक नियोक्त्यांनी आणि एक लाखांपेक्षा अधिक रोजगार इच्छुक युवक-युवतींनी रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केली आहे. सहभागी उद्योजकांकडून २५,००० पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी रिक्त पदांची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्हानिहाय शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थानिक प्रशासन व इतर संस्थांच्या समन्वयातून उमेदवार व नियोक्त्यांचे समन्वय करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in