निर्मल लाईफ स्टाईलच्या ३० प्रकल्पांविरोधात 'महारेरा'ची दिवाळखोरीची कारवाई सुरू

‘महारेरा’ने दिवाळखोरीची कारवाई सुरू असलेल्या ३०८ प्रकल्पांची यादी जाहीर केली असून, त्यात या समूहाच्या ३० प्रकल्पांचा समावेश
निर्मल लाईफ स्टाईलच्या ३० प्रकल्पांविरोधात 'महारेरा'ची दिवाळखोरीची कारवाई सुरू

घर देण्याच्या नावाखाली ३३ ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम क्षेत्रातील नामांकित निर्मल लाईफ स्टाईल समूहाचे धर्मेश जैन आणि राजीव जैन यांना गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर आता निर्मल लाईफ स्टाईल समूहाच्या तब्बल ३० प्रकल्पांवर दिवाळखोरीची कारवाई सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. ‘महारेरा’ने दिवाळखोरीची कारवाई सुरू असलेल्या ३०८ प्रकल्पांची यादी जाहीर केली असून, त्यात या समूहाच्या ३० प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकल्पांतील हजारो ग्राहक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

निर्मल लाईफ स्टाईल समूहाने मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर घरे बांधली आहेत. आजही या समूहातर्फे घरबांधणीचे काम सुरू आहे. मात्र, या समूहाच्या ‘महारेरा’कडील नोंदणीकृत तब्बल ३० प्रकल्पांविरोधात राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत (एनसीएलटी) कारवाई करण्यात आली आहे.

‘रेरा’ कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती तीन महिन्यांनी अद्ययावत करणे बंधनकारक आहे. मात्र, मुंबईतील हजारो प्रकल्पांमध्ये या नियमांचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘महारेरा’ने या प्रकल्पांमध्ये लक्ष घातले असून, त्यांची माहिती तपासण्यात येत आहे. ‘एनसीएलटी’च्या संकेतस्थळावरील नादारी आणि दिवाळखोरीची कारवाई सुरू असलेल्या यादीत ‘महारेरा’ नोंदणीकृत ३०८ प्रकल्पांचा समावेश आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ही यादी ‘महारेरा’ने आपल्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली आहे. या यादीत निर्मल लाईफ स्टाईल समूहाच्या ३० प्रकल्पांचा समावेश असून, यापैकी बहुतांश प्रकल्प हे कल्याणमधील आहेत. त्यामुळे केवळ ३३ ग्राहकांचीच नव्हे तर भविष्यात ३० प्रकल्पांतील हजारो ग्राहकांचीही फसवणूक होण्याची आणि ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निर्मल लाईफ स्टाईल समूहाच्या प्रकल्पातील अनेक ग्राहकांनी ‘महारेरा’कडे तक्रार केली असून, त्या आधारे ‘महारेरा’ने ८७ तक्रारदार सदनिकाधारकांच्या २३.८९ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निर्मल लाईफ स्टाईल समूहाची मुलुंड येथील स्थावर संपत्ती जप्त केली आहे. या जप्त मालमत्तेचा लिलावही घोषित झाला होता. परंतु, समूहाने उच्च न्यायालयाकडून त्यास स्थगिती मिळवल्याने हे ८७ तक्रारदारही नुकसानभरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in