महारेरा ॲक्शन मोडमध्ये; १४ महिन्यांत १२५ कोटींची वसुली

महारेरा ॲक्शन मोडमध्ये; १४ महिन्यांत १२५ कोटींची वसुली

मुंबई उपनगरातील ११४ प्रकल्पांतील २९८ कोटींच्या वसुलीसाठी ४३४ वॉरंट्स जारी करण्यात आलेले आहेत. यापैकी ४० प्रकल्पांतील ७५ वॉरंट्सचे ७१.०६ कोटी वसूल झाले आहेत. यानंतर पुण्याचा क्रमांक असून तेथील १२३ प्रकल्पांतील १८१.४९ कोटी वसुलीसाठी २३९ वॉरंट्स जारी करण्यात आलेले आहेत.

मुंबई : घर खरेदीदारांची नुकसानभरपाई वसूल करण्यासाठी महारेरा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. ४२१ प्रकल्पांतील ६६१.२५ कोटींच्या वसुलीसाठी १०९५ वॉरंट्स जारी केले आहेत. वॉरंट्स जारी करताच ११७ प्रकल्पांतील १५९.१ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे १४ महिन्यांत १२५ कोटी वसूल करणारी महारेरा हे देशातील पहिले प्राधिकरण ठरले आहे.

घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाई वसुलीसाठी महारेराने कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वसुली आणखी प्रभावीपणे करता यावी, यासाठी येथून पुढे जारी होणाऱ्या प्रत्येक वॉरंट्समध्ये संबंधित विकासकांचा बँक खाते क्रमांकही आवर्जून कळविण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. ज्यामुळे गरजेनुसार वसुलीसाठी महसूल यंत्रणेला संबंधित विकासकाच्या खात्यावरही टाच आणणे शक्य होणार आहे. महारेराने गेल्यावर्षी जानेवारीत घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईच्या वसुलीसाठी सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. ते सातत्याने सर्व संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्कात असतात. महारेराने या वसुलीला सर्वोच्च प्राधान्य दिलेले असून प्रत्येक खातेप्रमुखांच्या बैठकीत याचा आढावा घेतला जातो. गरजेनुसार महारेरा संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांना सुनावणीसाठी पाचारण करून त्या-त्या जिल्ह्यातील नुकसान भरपाईची वसुली मार्गी लावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.

राज्यात सर्वात जास्त वॉरंट्स आणि रक्कम

मुंबई उपनगरातील ११४ प्रकल्पांतील २९८ कोटींच्या वसुलीसाठी ४३४ वॉरंट्स जारी करण्यात आलेले आहेत. यापैकी ४० प्रकल्पांतील ७५ वॉरंट्सचे ७१.०६ कोटी वसूल झाले आहेत. यानंतर पुण्याचा क्रमांक असून तेथील १२३ प्रकल्पांतील १८१.४९ कोटी वसुलीसाठी २३९ वॉरंट्स जारी करण्यात आलेले आहेत. यापैकी ३५ प्रकल्पांतील ५५ वॉरंट्सपोटी ३८.९० कोटी रुपये वसूल झाले आहेत.

जिल्हानिहाय अशी झाली वसुली

  • मुंबई शहर - १७ प्रकल्पांतील ३२ वॉरंट्सपोटी ६४.७३ कोटी देय. यापैकी ८ प्रकल्पांतील १४ वॉरंट्सपोटी २१.१९ कोटी वसूल.

  • मुंबई उपनगर - ११४ प्रकल्पांतील ४३४ वॉरंट्सपोटी २९८ कोटी देय. यापैकी ४० प्रकल्पांतील ७५ वॉरंट्सपोटी ७१.०६ कोटी वसूल

  • पुणे - १२३ प्रकल्पांतील २३९ वॉरंट्सपोटी १८१.४९ कोटी देय. यापैकी ३५ प्रकल्पांतील ५५ वॉरंट्सपोटी ३८.९० कोटी वसूल

  • ठाणे - ७७ प्रकल्पांतील १७४ वॉरंट्सपोटी ५८.७ कोटी देय. यापैकी ७ प्रकल्पांतील ८ वॉरंट्सपोटी ४.७३ कोटी वसूल.

  • अलिबाग/रायगड - ४२ प्रकल्पांतील १०६ वॉरंट्सपोटी २१.१८ कोटी देय. यापैकी १८ प्रकल्पांतील ५६ वॉरंट्सपोटी ७.४५ कोटी वसूल.

  • पालघर - ३० प्रकल्पांतील ६५ वॉरंट्सपोटी १७.६८ कोटी देय. यापैकी ४ प्रकल्पांतील ४ वॉरंट्सपोटी १.६४ कोटी वसूल.

  • नागपूर - ५ प्रकल्पांतील १९ वॉरंट्सपोटी १०.६६ कोटी देय. यापैकी एका प्रकल्पांतील १२ वॉरंट्सपोटी ९.४१ कोटी वसूल.

  • औरंगाबाद - २ प्रकल्पांतील १३ वॉरंट्सपोटी ४.०४ कोटी देय. पैकी २ प्रकल्पांतील ९ वॉरंट्सपोटी ३.८४ कोटी वसूल.

  • नाशिक - ५ प्रकल्पांतील ६ वॉरंट्सपोटी ३.८५ कोटी देय. पैकी ३ प्रकल्पांतील ३ वॉरंट्सपोटी ०.०७ कोटी वसूल.

  • चंद्रपूर - १ प्रकल्पांतील १ वॉरंटपोटी ०.०९ कोटी देय. पैकी सर्व वसूल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in