महारेरा देणार पार्किंगचा तपशील; अभ्यागतांसाठीच्या पार्किंगची माहितीही समजणार

महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहककेंद्रित आमूलाग्र बदल केले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहककेंद्रित आमूलाग्र बदल केले आहेत. त्यानुसार प्रमाणपत्राच्या परिशिष्टात प्रकल्पाचे क्षेत्रफळ, इमारतीचे व विंग्सचे नाव किंवा क्रमांक, प्रकल्पातील निवासयोग्य मजले, प्रकल्पातील निवासी सदनिका आणि अनिवासी गाळ्यांची एकूण संख्या, इमारतीला किती मजल्यांपर्यंत परवानगी मिळालेली आहे त्याचा तपशील दर्शवणारे अत्यंत महत्त्वाचे प्रारंभ प्रमाणपत्र, चारचाकी, दुचाकी आणि अभ्यागतांसाठीच्या एकूण पार्किंगची संख्या हा समग्र तपशील असणार आहे.

प्रवर्तकाने प्रकल्पाच्या कुठल्याही बाबीत काही दुरुस्त्या केल्यास, प्रकल्पाला मुदतवाढ घेतल्यास किंवा प्रकल्पाचे दुसऱ्या प्रवर्तकाकडे हस्तांतरण केल्यास हा तपशीलही या प्रकल्पाला भविष्यात दिल्या जाणाऱ्या सुधारित प्रमाणपत्रात राहणार आहे. सर्व प्रवर्तक हे प्रमाणपत्र प्रकल्पस्थळी, प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ठळकपणे प्रदर्शित करीत असतातच. प्रकल्पाच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने प्रकल्पाबाबतची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर शोधताना पहिल्याच पानावर या प्रमाणपत्राची लिंक असते.

घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून या क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महारेराने यापूर्वी घेतलेले आहेत. नोंदणी प्रमाणपत्रात वरील उपयुक्त माहिती समाविष्ट करण्याचा हा निर्णयही असाच ग्राहकांना चांगल्या प्रकारे मदत करणारा, पथदर्शक आणि महत्त्वपूर्ण आहे.

घर खरेदीदारांना दिलासा

प्रमाणित घर विक्री करार, घर नोंदणीपत्र, पार्किंगची लांबी, रुंदी, उंची, स्थळ शिवाय आश्वासित सेवासुविधांच्या उपलब्धतेचे तपशील, अशा बाबी अपरिवर्तनीय असल्याचे महारेराने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. या निर्णयांचा घर खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत असून देशातील इतर अनेक विनियामक प्राधिकरणांनीही त्यांच्या क्षेत्रात या निर्णयांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे.

क्यूआर कोड स्कॅनचा उपयोग

याशिवाय प्रकल्पाशी संबंधित सर्व प्राथमिक माहिती क्यूआर कोडमध्ये देऊन सर्व माध्यमांतील जाहिरातींमध्ये प्रकल्पाच्या नोंदणी क्रमांकासोबत छापणे यापूर्वीच महारेराने बंधनकारक केलेले आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करूनही प्रकल्पाशी संबंधित प्राथमिक माहिती मिळवता येऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in