घर खरेदीदारांना महारेराचा दिलासा; सोयीसुविधांचा डेटा देणे विकासकांना बंधनकारक

पार्किंगमधील त्रुटी दूर करून त्यात सुसूत्रता आणणारा अपरिवर्तनीय तरतुदींचा आदेश जारी केल्यानंतर महारेराने आता नवीन गृहनिर्माण प्रकल्पांतील सुविधा, सुखसोयीतील अनिश्चितता संपविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
घर खरेदीदारांना महारेराचा दिलासा; सोयीसुविधांचा डेटा देणे विकासकांना बंधनकारक

मुंबई : घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इमारतीत तरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, नाट्यगृह, सोसायटीचे कार्यालय, व्यायामशाळा, स्क्वॉश कोर्ट या सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत का, याचा डेटा देणे विकासकांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच देण्यात येणाऱ्या सुविधा कधीपर्यंत उपलब्ध होणार, या सगळ्या सुविधा किती क्षेत्रात उपलब्ध करणार, याचा तपशील देणे अनिवार्य करण्यात आले आहे. घरखरेदी करणाऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी महारेराने घेतलेल्या या निर्णयामुळे घरखरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पार्किंगमधील त्रुटी दूर करून त्यात सुसूत्रता आणणारा अपरिवर्तनीय तरतुदींचा आदेश जारी केल्यानंतर महारेराने आता नवीन गृहनिर्माण प्रकल्पांतील सुविधा, सुखसोयीतील अनिश्चितता संपविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आदर्श विक्री करारात अनुसूचि-२मध्ये आतापर्यंत सुविधा आणि सुखसोयींचा फक्त उल्लेख होता. आता या प्रस्तावित आदेशात दिल्याप्रमाणे प्रत्यक्षात आश्वासित सुविधा आणि सुखसोयी कधी उपलब्ध होणार, याचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आश्वासित सर्व सुविधा, सुखसोयी इमारतीतील रहिवासी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार? त्याचा आकार काय राहील? याचाही तपशील तारखेसह देणे आता बंधनकारक राहणार असल्याचे नवीन आदेशात प्रस्तावित करण्यात आले आहे. विक्री करार करताना या प्रस्तावित आदेशासोबत दिलेल्या जोडपत्राच्या मसुद्यानुसार विक्री कराराचा भाग म्हणून देणे बंधनकारक आहे. घर खरेदीदारांच्या दृष्टीने याचेही महत्त्व लक्षात घेता ही तरतूदही अपरिवर्तनीय राहणार आहे.

ग्राहक हितासाठी सहावी तरतूद

यापूर्वी प्रमाणित विक्री करारातील दैवी आपत्ती, दोषदायित्व कालावधी, चटई क्षेत्र, हस्तांतरण आणि नव्याने समाविष्ट केलेल्या पार्किंगनंतर ही सहावी तरतूद अपरिवर्तनीय राहणार असल्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in