मुंबई : वारंवार संधी देऊनही सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या एजंटना महारेराने चांगलाच दणका दिला आहे. प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या राज्यातील सुमारे २० हजार एजंट्सची नोंदणी वर्षभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. तसेच अपात्र एजंट्सची सेवा घेणाऱ्या विकासकांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा महारेराने दिला आहे.
स्थावर संपदा क्षेत्रातील एजंट्सनी १ जानेवारी २०२४ नंतर प्रशिक्षणासह परीक्षेचे प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदविल्याशिवाय व्यवसाय करता येणार नसल्याचे महारेराने जाहीर केले आहे. त्याप्रमाणे सुमारे २० हजार एजंट्सनी अद्यापही या अटींची पूर्तता केलेली नाही. तर काहींनी सक्षमता प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदवलेले नाही. या सर्वांची नोंदणी महारेराने वर्षभरासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून, प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदवले तर त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तर वर्षाच्या कालावधीत जे एजंट प्रतिसाद देणार नाहीत, त्यांची नोंदणी वर्षानंतर आपोआप रद्द होईल. त्यानंतर ६ महिने त्यांना अर्ज करता येणार नाही. तर ६ महिन्यांनंतर नव्याने नोंदणी घेता येईल. या काळात त्यांना स्थावर संपदा क्षेत्रात व्यवहार करता येणार नाही. या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय महारेराने एका जाहीर केला आहे.
यापूर्वी १३ हजार ७८५ एजंट्सची नोंदणी रद्द
महारेरा स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ४७ हजार एजंट्सनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यापैकी १३ हजार ७८५ एजंट्सनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण न केल्यामुळे त्यांची नोंदणी महारेराने यापूर्वी रद्द केली आहे.
एजंट्सचा परवाना रद्द करण्यासाठीची कार्यपद्धती जाहीर
अनेक एजंट्सनी विविध त्यांची एजंट म्हणून नोंदणी रद्द करण्याची विनंती महारेराकडे केलेली आहे. ही नोंदणी रद्द करता यावी यासाठी महारेराने कार्यपद्धती जाहीर केली आहे. यासाठी संबंधितांनी महारेराचे संचालक (नोंदणी) यांच्याकडे dereg.agent@gmail.com या मेलवर विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे.
यासाठी होते एजंट्सची मदत
या क्षेत्रातील एजंट्सना रेरा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी माहित असायला हव्यात. ज्यात विकासक आणि प्रकल्प याची विश्वासार्ह प्राथमिक माहिती, प्रकल्पाच्या जमिनीच्या हक्काची वैधता, रेरा नियमानुसार चटई क्षेत्र, इमारतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या तत्सम मंजुऱ्या, प्रकल्पाच्या विरुद्ध, असल्यास, कज्जेदलालीचा तपशील, संबंधित विकासकाची आर्थिक क्षमता याबाबी कशा मिळवायच्या, समजून घ्यायच्या, हे त्यांना माहीत असायला हवे. या माहितीच्या आधारे ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात.
"महारेराने एजंट्सना प्रशिक्षण घेऊन, परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केलेले आहे. १० जानेवारी २३ रोजी घेतलेल्या या निर्णयाला अनेकदा मुदतवाढ देऊन अखेर १ जानेवारी २४ नंतर तो सर्व एजंट्ससाठी बंधनकारक करण्यात आला. तरीही पात्रता नसलेले २० हजाराच्यावर एजंट्स या क्षेत्रात कार्यरत आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्यात आले. गरज पडल्यास या अपात्र एजंट्सची सेवा घेणाऱ्या विकासकांची महारेरा नोंदणी रद्द करायला महारेरा कचरणार नाही. तशी वेळ विकासकांनी महारेरावर आणू नये." - अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा