विकासकांना महारेराचा दट्ट्या; प्रकल्पाची माहिती न देणाऱ्यांची यादीच केली जाहीर

प्रकल्पाचे काम सुरू झाले की नाही, प्रकल्पाची सद्यस्थिती काय याबाबतचा अहवाल सादर न करणाऱ्या २१२ प्रकल्पांची जिल्हानिहाय यादीच महारेराने संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
विकासकांना महारेराचा दट्ट्या; प्रकल्पाची माहिती न देणाऱ्यांची यादीच केली जाहीर

मुंबई : प्रकल्पाचे काम सुरू झाले की नाही, प्रकल्पाची सद्यस्थिती काय याबाबतचा अहवाल सादर न करणाऱ्या २१२ प्रकल्पांची जिल्हानिहाय यादीच महारेराने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी महारेराने हा निर्णय घेतला आहे.

जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांत महारेराकडे नोंदवलेल्या २१२ प्रकल्पांचे काम सुरू झाले की नाही, या प्रकल्पांची सद्यस्थिती काय, याबाबत महारेराकडे कुठलीही माहिती या प्रकल्पांनी सादर केलेली नाही. महारेराकडे प्रकल्पाची नोंद केल्यानंतर दर तीन महिन्याला महारेराकडे त्रैमासिक प्रगती अहवाल विहित प्रपत्रात सादर करून तो संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. परंतु या २१२ विकासकांनी महारेराच्या वारंवारच्या पाठपुराव्याला दाद न देऊन ते त्यांच्याच प्रकल्पाबाबत गंभीर नाही, हे सिद्ध केलेले आहे. ग्राहकांप्रती आणि विनियामक तरतुदींच्या पूर्ततेबाबत उदासिनता दाखवणाऱ्या अशा प्रकल्पांतील ग्राहकांची गुंतवणूक सुरक्षित राहणार नाही. म्हणून ग्राहकांना सावध करण्यासाठी, त्यांना गुंतवणूक करताना मदत व्हावी यासाठी महारेराने अशा प्रकल्पांची जिल्हानिहाय यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

दरम्यान, महारेराला अहवाल सादर केल्याने प्रकल्पाचे बांधकाम, खर्च आणि तत्सम बाबींचे सुक्ष्म संनियंत्रण करायला मदत होते. शिवाय वेळीच त्रुटीही निदर्शनास आणून देता येतात. यातून घरखरेदीदार सक्षम होत असून, त्यांना गुंतवणूक केलेल्या किंवा गुंतवणुकीची इच्छा असलेल्या प्रकल्पाची अधिकृत सर्व माहिती सहज उपलब्ध होते.

नोटिसीनंतर दंडात्मक रक्कम जमा!

जानेवारी ते एप्रिल (२०२३) या काळात महारेराकडे नोंदविलेल्या २३६९ प्रकल्पांपैकी ८८६ प्रकल्पांनी त्रैमासिक प्रगती अहवाल सादर केलेले नव्हते. त्यामुळे प्रकल्प स्थगित करून त्याचे बँक खाते गोठवणारी, प्रकल्पाच्या सर्व व्यवहारांवर बंदी आणण्यासाठीची कलम ७ अंतर्गत ३० दिवसांची नोटीस दिली होती. तसेच वेळोवेळी दूरध्वनीवरून आवाहनही केले होते. त्यानंतर यापैकी ६७२ प्रकल्पांनी दंडात्मक रक्कम भरली.

२१२ प्रकल्पांची जिल्हानिहाय यादी, मुंबई महाप्रदेशातील कोकणसह क्षेत्र

-पालघर- २३, ठाणे - १९, रायगड- १७, मुंबई शहर- ७, मुंबई उपनगर-४, रत्नागिरी-५, सिंधुदुर्ग-१ एकूण - ७६

-पुणे क्षेत्र : पुणे - ४७, सांगली - ६, सातारा - ५, कोल्हापूर-४, सोलापूर - २ एकूण - ६४

-उत्तर महाराष्ट्र : नाशिक- २३, अहमदनगर- ५, जळगाव- ३ एकूण- ३१

-विदर्भ : नागपूर- ८, अमरावती - ४, चंद्रपूर, वर्धा प्रत्येकी ३, भंडारा, बुलडाणा आणि अकोला प्रत्येकी - १ एकूण- २१

-मराठवाडा : संभाजीनगर- १३, बीड- ३, नांदेड- २, लातूर आणि जालना प्रत्येकी १ एकूण- २०

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in