महारेराचे संकेतस्थळ काही दिवस राहणार बंद; 'महाक्रिटी'चे काम अंतिम टप्प्यात

या काळात संकेतस्थळ वापरासाठी उपलब्ध असणार नाही. संकेतस्थळाच्या संक्रमणाच्या या काळात सर्व संबंधितांनी महारेराला सहकार्य करावे, असे आवाहन महारेराच्यावतीने करण्यात आले आहे.
महारेराचे संकेतस्थळ काही दिवस राहणार बंद; 'महाक्रिटी'चे काम अंतिम टप्प्यात
Published on

मुंबई : महारेराच्या नवीन 'महाक्रिटी' संकेतस्थळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे संकेतस्थळ सेवेत कार्यरत होण्यापूर्वी १३ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत प्रवर्तक आणि एजंट्स यांच्यासाठी बंद राहणार आहे. घरखरेदीदारांना २० ते ३१ ऑगस्टपर्यंत तक्रार अर्ज ऑनलाईनऐवजी स्वहस्ते करावे लागणार आहेत. या तक्रारींच्या सुनावण्याही विनाखंड सुरू राहणार आहेत.

महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्पांची नोंदणी, नुतनीकरण आणि दुरूस्त्या, एजंट्सची नोंदणी व नुतनीकरण, घर खरेदीकरार व तत्समांच्या तक्रारी ही कामे नियमितपणे होतात. जुन्या संकेतस्थळावरून नवीन संकेतस्थळावर विदा स्थलांतरित होताना ही यंत्रणा विविध तांत्रिक संक्रमणावस्थेतून जाणार आहे. या काळात संकेतस्थळ वापरासाठी उपलब्ध असणार नाही. संकेतस्थळाच्या संक्रमणाच्या या काळात सर्व संबंधितांनी महारेराला सहकार्य करावे, असे आवाहन महारेराच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रवर्तक आणि एजंटस यांना १३ ऑगस्टपर्यंत काम करता येईल. त्यानंतर १३ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून (११.५९) ते ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत (११.५९) या कालावधीत संकेतस्थळ उपलब्ध राहणार नाही. या मंडळींनी १३ पूर्वी सादर केलेल्या बिनचूक अर्जांवर महारेराचे अधिकारी कार्यवाही करतील. महारेराने स्थापनेवेळी तयार केलेल्या संकेतस्थळात काळसुसंगत अमुलाग्र बदल करायला सुरुवात केलेली आहे. हे संकेतस्थळ तयार करताना भावी पिढीच्या व्यवसाय केंद्री, माहिती तंत्रज्ञान, व्यवसायिक बुध्दीमत्ता आणि विदा विश्लेषणाचा वापर करून सर्व विनियामक आणि तक्रार व्यवस्थापनाची कामे होणार आहेत.

महारेराच्या संकेतस्थळाची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा वापर दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढतोच आहे. काही महिन्यांपूर्वी तो दिवसाला ५ हजार आणि तासाला २०० च्या आसपास होणारा संकेतस्थळाचा वापर वाढून आता दिवसाला ३४ हजारापेक्षा जास्त आणि तासाला १४०० पेक्षा जास्त झाला आहे. दिवसागणित ही संख्या वाढतेच आहे. ही वाढती जबाबदारी लक्षात घेऊन महारेराचे संकेतस्थळ या दृष्टीने काळ सुसंगत, अद्ययावत, वापर स्नेही आणि वाढत्या अपेक्षांची आव्हाने समर्थपणे पेलणारे असावे, यासाठी नियोजन केले आहे. याशिवाय कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित चॅटबोट आणि मोबाईल अॅप्लीकेशनचीही सुविधा नव्यानेच उपलब्ध करून देण्यात येत आहे. - अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा.

logo
marathi.freepressjournal.in