

मुंबई : महागड्या पीईटी-सीटी तपासणीमुळे कर्करोगाचे निदान आणि उपचार रखडण्याची वेळ आता टळणार आहे. कर्करोगाचे अचूक निदान होऊन वेळेत उपचार शक्य व्हावेत, यासाठी राज्य सरकारने ही तपासणी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ६३ उपचार पॅकेजमध्ये अतिरिक्त निदान प्रक्रिया, तर १३ प्रकारच्या कर्करोगांसाठी स्वतंत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे कॅन्सर रुग्णावरील आर्थिक भार कमी होणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. पीईटी-सीटी तपासणीचा खर्च परवडत नसल्याने अनेक रुग्ण ही तपासणी पुढे ढकलतात किंवा टाळतात. त्यामुळे आजाराचे अचूक स्वरूप समजणे आणि योग्य - उपचार वेळेत सुरू करणे शक्य होत नाही.
ही बाब लक्षात घेऊन या तपासणीचा आरोग्य योजनांमध्ये समावेश करण्याची मागणी होत होती. त्यानुसार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती.
पात्र रुग्णांना लाभ
या आधी ४४ उपचार पॅकेजमध्ये पीईटी-सीटी तपासणीचा अतिरिक्त निदान प्रक्रिया म्हणून समावेश होता. आता ही सुविधा ६३ उपचार पॅकेजपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. याशिवाय निवडक १३ प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी पीईटी-सीटी स्कॅन स्वतंत्र किंवा नियमित निदान प्रक्रिया म्हणून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पात्र रुग्णांना याचा लाभ घेता येईल.
अटींचे काटेकोर पालन करावे लागणार
या सुविधेचा लाभ देताना संबंधित करावे लागणार आहे. तसेच, अंगीकृत रुग्णालयांना अटींचे काटेकोर पालन रुग्णालयात आवश्यक तांत्रिक सुविधा, उपकरणे, पात्र मनुष्यबळ आणि स्वतःचे पीईटी-सीटी केंद्र असणे आवश्यक आहे. तपासणीपूर्वी पूर्वमान्यता घेणे आणि आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे सादर करणेही बंधनकारक राहणार आहे.
पीईटी-सीटी तपासणीचे निर्धारित दर
शासन निर्णयानुसार, पीईटी-सीटी तपासणीसाठी पुढील दर निश्चित करण्यात आले आहेत.
संपूर्ण शरीर : २० हजार ४०० रुपये
मेंदू : १४ हजार ६५० रुपये
गॅलियम-६८ : १५ हजार रुपये
हृदय : ९ हजार ४०० रुपये
पीईटी-सीटी तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने कर्करोगाचे अचूक निदान आणि उपचारांचे वेळेत नियोजन करणे शक्य होईल. महागड्या तपासणीचा आर्थिक भार कमी करून कर्करोग रुग्णांना दिलासा देणारा हा निर्णय कर्करोगविरोधी लढ्यात महत्त्वाचा टप्पा ठरेल.
प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री