
मुंबई : महायुती सरकारमध्ये कोणताही समन्वय नसून हे महायुती नव्हे तर महाझुठी सरकार आहे. भ्रष्टाचार करायचा आणि पक्ष फोडायचे हेच यांचे काम. मुख्यमंत्र्यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला असून यावेळी मंत्र्यांना बघितल्यावर आठवेल की आपण यांच्यावर आरोप केले होते, असा चिमटा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.
सरकारमध्ये भाजप एक, तर दोन गद्दार गँग आहेत. त्यामुळे चहापानाला जाणे म्हणजे पाप, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केला. राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रती सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात, हिंदी भाषा सक्ती यामुळे हे सरकार म्हणजे तीन पक्ष, तीन तोंडं, अशी टीका दानवे यांनी केली. अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, सचिन अहिर, अनिल परब आदी नेतेमंडळी उपस्थित होती.
“सत्ताधारी पक्षाचे लोक वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत, पोलिसांचे त्यांना संरक्षण आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांना प्रोत्साहन देत आहेत. नेमके भाजप आणि गद्दारांनी आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे,” अशी टीका दानवे यांनी केली.
“ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचे नाव दिले; त्यावरच खड्डे पडले आहेत. नदी वाहत आहे, हे नेमकं काय चाललंय?” अशा शब्दात समृद्धी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
भ्रष्टाचार टक्केवारीचे सरकार - विजय वडेट्टीवार
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. हे बळीराजाला फसवणारे लोक आहेत. हे त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या बापाला पैसे दिले, कपड्याला पैसे दिले, असे यांचे मंत्री राहिलेले बबनराव लोणीकर म्हणाले. या सरकारमध्ये पैसे दिल्याशिवाय, टक्केवारी दिल्याशिवाय कोणतीच कामे होत नाहीत,” अशी टीका कॉग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
जनतेचे पैसे खाणे सुरू - जितेंद्र आव्हाड
“काळी पूजा येथे केली जाते. जिथे जाईल तिथे नगरसेवक फोडले जात आहेत. तीन ते चार कोटी रुपये यासाठी दिले जात आहेत. एका टेंडरसाठी ३ हजार कोटी रुपये खाल्ले जात आहेत. १२ कोटी जनतेचे पैसे खाणे यांनी सुरू केले आहे,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.
शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत आहेत. त्याला राजकीय रंग का दिला जातोय, असा सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार असून गरज नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.