महाविकास आघाडी एकत्रच; उद्धव ठाकरे यांचे स्‍पष्‍टीकरण

न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे दोन आधारस्‍तंभ जोपर्यंत मजबूत आहेत, तोपर्यंत देशात लोकशाहीच राहील
महाविकास आघाडी एकत्रच; उद्धव ठाकरे यांचे स्‍पष्‍टीकरण

महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा कोरोना या जागतिक संकटाचा मुकाबला एकत्र केला. त्‍यासमोर आताचे संकट तर काहीच नाही. आघाडी फुटलेली नाही. आम्‍ही एकत्रच आहोत. पुढे काय करायचे हे लवकरच सांगू, अशा शब्‍दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी एकत्र असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. न्यायदेवता आणि जनता हे लोकशाहीचे दोन आधारस्‍तंभ जोपर्यंत मजबूत आहेत, तोपर्यंत देशात लोकशाहीच राहील, बेबंदशाही येणार नाही, असा विश्वासही त्‍यांनी व्यक्‍त केला. महाविकास आघाडीची बैठक विधानभवनात पार पडली. त्‍या बैठकीला उपस्‍थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर उदधव ठाकरे पहिल्‍यांदाच विधानभवनात आले होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना त्‍यांनी विधानपरिषद सदस्‍यत्वाचाही राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र काही कारणांमुळे त्‍यांनी तो दिलेला नाही. आगामी काळात होणाऱ्या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्या निवडणुका तसेच राज्‍यातील सत्‍तासंघर्षावर न्यायालयात सुरू असलेल्‍या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर विचार करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नाना पटोले, अजित पवार आदी नेते उपस्‍थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे आमदार होते.

हे संकट काहीच नाही -उद्धव

आजच्या बैठकीत नेमके काय घडले, हे जर तुम्हा सगळ्यांना सांगायचे असते तर तुमच्यासमोरच बैठक घेतली असती ना. बऱ्याच दिवसांनंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र भेटले, चांगल्या गप्पा झाल्या. विविध विषयांवर छानपैकी चर्चा झाली. मविआ सरकार म्हणून जगावर आलेल्या कोव्हिडच्या संकटाचा आम्ही मुकाबला केला, त्याच्यापुढे बंडाचं संकट काहीच नाही? जे जवळचे होते, त्यांनी धोका दिला पण या बंडाच्या संकटात माझ्या पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहिली. आता पुढची काय रणनीती असेल, ते लवकरच स्पष्ट करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in