BMC Election : महायुतीचे महिलांसाठी योजनांचे वाण; बेस्टमध्ये ५० टक्के सूट; ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; वचननामा जाहीर

मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून रविवारी वचननामा जाहीर करण्यात आला. मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर देणार. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकिटात ५० टक्के सूट देण्याचे आश्वासन...
मुंबईच्या ऐतिहासिक विकासपर्वाचा वचननामा जाहीर
मुंबईच्या ऐतिहासिक विकासपर्वाचा वचननामा जाहीरPhoto : X (Devendra Fadanvis)
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून रविवारी वचननामा जाहीर करण्यात आला. मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर देणार. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकिटात ५० टक्के सूट देण्याचे आश्वासन तसेच महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज तसेच मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे तसेच रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबईचे आश्वासनही महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, भाजप मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम, मुंबईतील आमदार आणि तिन्ही पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दोन लाख नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन हा वचननामा तयार करण्यात आला आहे. या वचननाम्यात झोपडपट्टीमुक्त मुंबई, २० ते ३५ लाख घरांची निर्मिती करणे, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ तयार करणे, पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती, धारावीचा विकास हा डीआरपी करणार, ३५० स्केअर फूटांपर्यंत आम्ही धारावीतच घरे देणार, अशा बड्या घोषणा मुंबईकरांसाठी करण्यात आल्या आहेत.

‘कोविडमध्ये घोटाळा करणारे, खिचडीमध्ये घोटाळा करणारे, बॅगमध्ये घोटाळा करणारे आता जेलमध्ये आहेत. त्यामुळे आता चार्जशीटच तयार आहे. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबई सोडून जावे लागणार नाही, हे आम्ही करून दाखवले आहे. काही लोक फक्त बोलत राहिले, तर काम करणारी फक्त महायुतीच आहे. धारावीचा विकास डीआरपी करणार आहे. यात शासन भागीदार आहे. धारावीत राहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ३५० स्केअर फुटांचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तेथील व्यवसाय, उद्योगांना तिथेच चांगल्या पद्धतीने इकोसिस्टिम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील सर्व सफाई कामगारांना २०१९ मध्ये स्वतःच्या मालकी हक्काची घरे देण्याचा निर्णय घेतला होता. तो उद्धव ठाकरेंनी बदलला, आता त्यांना मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय आम्ही पुन्हा घेतला आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

‘झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न होते. सुनियोजित मुंबईचा विकास करण्याची आमची जबाबदारी असून ती आम्ही या वचननाम्यातून करणार आहोत. गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्याचे आम्ही काम सुरू केले आहे. आतापर्यंत १२ हजार लोकांना घरे दिली आहेत. मुंबईला फिनटेक सीटी करण्याचा निर्धार आमचा आहे. बीकेसीला इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, स्टार्टअप हब उभारले जाणार आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ महापालिकेच्या रुग्णालयांना संलग्न करण्याचा आमचा मानस आहे. बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना ५० टक्के सवलत, लघु उद्योजकांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कोळीवाडा आणि गावठाण यांचे स्वतंत्र डीसीआर तयार करून पुनर्विकास, पुनर्विकास प्रकल्प राबवताना येणारे सगळे अडथळे आम्ही दूर केले आहेत. पाणीपट्टीत दरवर्षी ८ टक्के वाढ होते, पण ही वाढ पुढील ५ वर्षांसाठी स्थगित केली आहे. प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी १७ हजार कोटी रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धन करणे, प्रदूषित पाणी समुद्रात सोडणे बंद केले जाणार. मुंबई खड्डेमुक्त करणार,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

रोजगारयुक्त मुंबई करण्याचा मानस -फडणवीस

मुंबईमध्ये व्हायब्रेंट इकोसिस्टिम आहे. हायपेड रोजगार मुंबईत तयार करण्याचा प्रयत्न आहे. तरुणांना रोजगारयुक्त मुंबई तयार करणार. आगामी काळातील मुबंईतील पाण्याची समस्या लक्षात घेऊन पाण्याचे व्यवस्थापन केले जात आहे. गारगाई प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे मुबंईला ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी मिळणार आहे. पालिकेच्या शाळा आधुनिक करण्यात येणार असून मराठी लॅब तयार करण्यात येईल. आरोग्यक्षेत्रात चांगल्या सुविधा तयार करण्यात येणार असून २ हजार नवीन बेड तयार करण्याचे काम करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महायुतीच्या वचननाम्यातील ठळक मुद्दे

  • पुनर्विकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी योजना राबवणार

  • बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस

  • बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत

  • लाडक्या बहिणींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

  • मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी पुढील ५ वर्षांत गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार

  • पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत १७ हजार कोटी रुपये

  • बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार

  • सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार

  • फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार

  • लघु उद्योग धोरण राबवले जाणार

  • स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार

  • रोहिंग्या व बांगलादेशीमुक्त मुंबई करणार

  • पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार

  • मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार

  • बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम

  • पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार

  • हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचे संग्रहालय उभारणार

logo
marathi.freepressjournal.in