माहिम किल्ल्याला गतवैभव मिळणार! इतिहासिक वास्तू पुन्हा उजळणार

पालिकेने या किल्ल्याचा संवर्धनाचा निर्णय घेतला
माहिम किल्ल्याला गतवैभव मिळणार! इतिहासिक वास्तू पुन्हा उजळणार

मुंबई : ब्रिटिशकालीन वास्तू कशा होत्या, त्यावेळी देखावे कसे होते, याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात येणार आहे. यासाठी पुरातन वास्तू विशारद प्रख्यात विकास दिलावरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विकास दिलावरी याचा संपूर्ण अभ्यास करणार असून त्यांच्या रिपोर्ट नुसार माहिम किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार आहे.

११४० ते ११४१च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या या किल्यावर १९७० पासून काही रहिवासी वास्तव्यास आले. मुंबईतील किल्ल्यांचा इतिहास नवीन पिढीला उलगडावा, यासाठी माहिम किल्ल्यावरील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. आता माहिम किल्ल्याला नवी झळाळी देण्यासह पुरातन वास्तू कशा होत्या, त्यावेळी माहिम किल्ल्यावर असलेल्या वास्तू त्या तशाच दिसाव्यात, यासाठी माहिम किल्ल्याचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी किल्ल्यावरील बेकायदा बांधकामे हटवणे, कूंपण घालण्याचे काम सुरू असून माहिम चौपाटी चकाचक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माहिम किल्ल्याला गतवैभव प्राप्त झाल्यावर येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्यावरून वांद्रे सी लिंक न्याहाळता येणार आहे. यासाठी पुरातन वास्तूचा अभ्यास करणारे विकास दिलावरी याचा संपूर्ण रिपोर्ट तयार करणार असल्याचे जी. उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.

माहिम किल्याला ऐतिहासिक वारसा

लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा असणारा माहिम किल्ला एकेकाळी मुंबईच्या समुद्रीमार्गाचा संरक्षक शिलेदार मानला जात होता. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा माहीम किल्ला पाहण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटक येतात. मात्र किल्ल्यावर असणाऱ्या शेकडो झोपड्यांमुळे किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाला बाधा पोहोचत होती. तसेच अस्वच्छताही निर्माण होत होती. त्यामुळे पर्यटकांकडून याबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे पालिकेने या किल्ल्याचा संवर्धनाचा निर्णय घेतला.

logo
marathi.freepressjournal.in