मुंबई : माहीम येथील कंदील गल्ली ही विविध आकर्षक रंगीबेरंगी आकाश कंदीलसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी कंदील खरेदीसाठी येथे लोकांची गर्दी होत असते. यंदाही आकर्षक डिझाईन, पर्यावरणपूरक कंदील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. मुंबई व परिसरातील लोक दिवाळीच्या १० ते १५ दिवस आधीच येथे कंदील खरेदीसाठी येत असतात, असे कंदील विक्रेते विजय पाटील यांनी 'दैनिक नवशक्ति'शी बोलताना सांगितले.
माहीम येथील कंदील गल्लीत मुंबईतीलच नव्हे तर मुंबईबाहेरील लोकही कंदील खरेदीसाठी येत असतात. बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण, पनवेल, खारघर या ठिकाणचे लोक दिवाळीपूर्वी खास कंदील खरेदीसाठी कंदील गल्लीत येतात. रस्त्यावर दुकान थाटत असलो तरी रात्री २ वाजेपर्यंत कंदील खरेदीसाठी लोकांची गर्दी असते.
या कालावधीत दोन मिनिटे बोलायला वेळ नसतो एवढी गर्दी होते. माहीम, दादर, माटुंगा परिसरात काम करणारे लोक कामावरून सुटले की, जाता जाता कंदील खरेदीसाठी येतात. मुंबईतील बहुतांश कार्यालयात सजावटीसाठी लागणारे लहान, मोठे कंदील खरेदीसाठी कर्मचारी कंदील गल्लीत येतात.
आकाश कंदीलाची किंमत प्रति नग ५५० ते ७५० रुपये आहे. लहान कंदील १५० रुपये डझन विक्री केले जात आहेत. १५० रुपये ते ९०० रुपयांपर्यंत साईजनुसार कंदीलांची वेगवेगळी किंमत आहे.
कंदील गल्लीत वेगवेगळ्या डिझाईनचे कंदील उपलब्ध होत असल्याने मुंबईबाहेरील लोक कंदील खरेदीसाठी येतात. १५० रुपये ते ८५० रुपयांपर्यंत चांगले कंदील मिळत असल्याने लोक कंदील गल्लीत दिवाळीच्या आठ दिवस आधीच धाव घेतात.
बाजीराव सर्वोदे, कंदील विक्रेते