काल गुढीपाडव्याच्या निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभा घेतली होती. यावेळी माहीमच्या (Mahim) समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता की, "यावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर, त्याच्याच बाजूला आम्ही गणपतीचे मंदिर उभारू," यानंतर आज प्रशासनाने माहीमच्या समुद्र किनाऱ्याजवळच्या मजारीभोवतीचे अनधिकृत बांधकाम हटवले आहे. आज सकाळी मुंबई पालिकेचे अतिक्रम विरोधी पथक त्या जागेवर दाखल झाले आणि अनधिकृत अतिक्रम हटवण्यास सुरुवात केली.
माहीमच्या समुद्रात असलेल्या या जागेवर आधी काहीच नव्हते, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. हे सर्व गेल्या २ वर्षांमध्ये झाले असून यावर कारवाई झालीच पाहिजे, असे त्यांनी कालच्या सभेत सांगितले होते. यानंतर आज पालिका प्रशासनाने कारवाई करत अखेर माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण केली.
काल राज ठाकरे यांनी यासंदर्भात सभेतमध्ये व्हिडीओ दाखवल्यानंतर माहिम किनारा परिसर आणि दर्ग्याभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत कारवाईला सुरुवात झाली. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशसाने योग्य ती दक्षता घेतली होती.