
मुंबई : पावसाळा सुरू झाल्यामुळे तसेच मासेमारी बंद असल्यामुळे माहिम येथील सी फूड प्लाझा महापालिकेच्या नियमानुसार बंद ठेवण्यात आले होते. परंतु, आता पावसाने परतीचा मार्ग धरल्याने पालिकेने येत्या १५ ऑक्टोबरपासून सी फूड प्लाझा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातले पत्र महिला बचत गटातील सदस्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.
मुंबई महापालिका प्रशासनाने खवय्यांसाठी माहीम चौपाटीवर सुरू केलेल्या सी फूड प्लाझाला मुंबईकरांची पसंती मिळत आहे. या सी फूड प्लाझाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. समुद्राच्या सान्निध्यात अस्सल कोळी पद्धतीचे जेवण, कोळी संस्कृतीचा आस्वाद घेता येईल अशा या सी फूड प्लाझामुळे पर्यटकांनाही माहीम चौपाटीचे आकर्षण वाटू लागले. त्याचबरोबर महिला बचतगटही आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
कोळी महिला - बचत गटांमध्ये वाद
महापालिकेने कोळी समाजासोबत बैठक घेऊन, कोळीवाड्याच्या आत राहणाऱ्या महिलांच्या स्वयं-साहाय्य गटांना काही स्टॉल दिले आहेत. पण काही स्वयं-साहाय्य गटांनी अशी मागणी केली आहे की फक्त माहिम बीचलगत राहणाऱ्या महिलांनाच व्यवसायाची परवानगी मिळावी. या प्रकरणावर कायदेशीर पातळीवर कारवाई सुरू आहे, अशी माहिती येथील कोळी महिलांनी दिली.