सांताक्रुझ घरफोडीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक

चोरट्याने घुसून कपाटातील सुमारे पावणेचार लाखांचे दागिने घेऊन पलायन केले होते
सांताक्रुझ घरफोडीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक

मुंबई : घरफोडीची उकल करण्यासाठी निर्मलनगर पोलिसांनी संशयित आरोपीला त्याच्या हाताचे ठसे मॅच झाल्याचे सांगून त्याची उलटतपासणी सुरू केली आणि त्याने अवघ्या काही तासांत आपण घरफोडी केल्याची कबुली देत चोरीचा सुमारे पावणेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. आदिल अहमद इक्बाल अहमद शेख असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. सांताक्रुझ येथे एका चाळीतील बंद घरात १८ ऑगस्ट रोजी चोरट्याने घुसून कपाटातील सुमारे पावणेचार लाखांचे दागिने घेऊन पलायन केले होते. दुपारी साडेतीन वाजता तिचा मुलगा कॉलेजमधून घरी आल्यानंतर त्याला त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच घरमालक महिलेने निर्मलनगर पोलिसांना घरफोडीची माहिती दिली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माळी, अंमलदार शेख, सोनावणे, कोयंडे यांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

logo
marathi.freepressjournal.in