'एस्केलेटर'च्या देखभालीसाठी पश्चिमपेक्षा मध्य रेल्वेचा खर्च अधिक; प.रे.वर १८२५ वेळा बंद पडते; म.रे.कडे तर माहितीच नाही

खर्चात जवळपास १.१२ लाखांची तफावत, माहिती अधिकारातून उघड
'एस्केलेटर'च्या देखभालीसाठी पश्चिमपेक्षा मध्य रेल्वेचा खर्च अधिक; प.रे.वर १८२५ वेळा बंद पडते; म.रे.कडे तर माहितीच नाही

मुंबई : जेष्ठ नागरिकांसह गरोदर महिलांसाठी रेल्वे स्थानकात सरकते जिने बसवण्यात आले आहेत. या सरकत्या जिन्याच्या देखभालीसाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यात सरकत्या जिन्याच्या देखभालीसाठी मध्य रेल्वे सर्वाधिक खर्च करत असून वर्षाला २.९७ लाख रुपये तर पश्चिम रेल्वे वर्षाला १.८५ लाख रुपये खर्च करत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे ‘एस्कलेटर’ म्हणजेच सरकत्या जिन्यांबाबत विविध माहिती विचारली होती. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता शकील अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेट ते विरारदरम्यान १०६ सरकते जिने आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्ष देखभाल खर्च हा १.८५ लाख रुपये इतका आहे. तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता एच. एस. सूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि सीएसटीएम ते वाशी या मार्गादरम्यान १०१ सरकते जिने आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्ष देखभाल खर्च हा २.९७ लाख रुपये इतका आहे.

असे असले तरी मुंबईकरांना सेवा पुरवणाऱ्या दोन रेल्वेमार्गाच्या अंतर्गत येणाऱ्या सरकत्या जिन्यांवरील खर्चामध्ये प्रचंड तफावत असल्याने गलगली यांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन्ही रेल्वेमार्गातील सरकत्या जिन्यांवरील खर्चात जवळपास १.१२ लाखांची तफावत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मध्य रेल्वेला वर्षाला १.२३ कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशीची मागणी करत संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुविधांसाठी बसविण्यात आलेले एस्केलेटर गर्दीच्या अधिकांश वेळी बंद असल्याने प्रवाशांना सुविधांऐवजी दुविधांचा सामना करावा लागतो, याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे.

१८२५ वेळा बंद पडते एस्केलेटर

पश्चिम रेल्वेने बंद होणाऱ्या एस्कलेटरची माहिती देताना स्पष्ट केले की, एका वर्षात १८२५ वेळा एस्कलेटर बंद पडते. आपत्कालीन बटन अज्ञात व्यक्तीकडून बंद केल्याने ९५ टक्के वेळा एस्केलेटर बंद होते. तर मध्य रेल्वेच्या एच. एस. सूद यांनी बंद एस्केलेटरची माहिती जतन न केल्याची कबुली दिली आहे. विशेष दिवशी बंद असलेल्या एस्केलेटरबाबत माहिती विचारली तर ती दिली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in