पे आणि पार्कसाठी डिजिटल पेमेंट प्रणाली करा; पालिका अर्थसंकल्पासाठी ७०हून अधिक हरकती सूचना

''नरिमन पॉइंट ते वांद्रे यासाठी सेंट्रल बिझनेस व्यवस्थापनासाठी स्वतंत्र सहायक आयुक्ताची नियुक्ती, महिलांसाठी एक उद्यान राखीव ठेवा, पे आणि पार्क ठिकाणी जादा शुल्क आकारणी टाळण्यासाठी पार्किंग शुल्क वसुलीसाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्यात यावी''
पे आणि पार्कसाठी डिजिटल पेमेंट प्रणाली करा; पालिका अर्थसंकल्पासाठी ७०हून अधिक हरकती सूचना

मुंबई : नरिमन पॉइंट ते वांद्रे यासाठी सेंट्रल बिझनेस व्यवस्थापनासाठी स्वतंत्र सहायक आयुक्ताची नियुक्ती, महिलांसाठी एक उद्यान राखीव ठेवा, पे आणि पार्क ठिकाणी जादा शुल्क आकारणी टाळण्यासाठी पार्किंग शुल्क वसुलीसाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्यात यावी, अशी सूचना माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी आगामी अर्थसंकल्पासाठी केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात प्रभागासाठी समान निधीवाटप करण्यात यावे, प्रभागातील विकासकामांवर भर द्या, आरोग्य व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी भरीव तरतूद करा, अशा प्रकारच्या ७० हून अधिक हरकती सूचनांची मंगळवार २३ जानेवारी रोजी संध्याकाळपर्यंत नोंद झाली.

दरम्यान, ३ किंवा ५ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असून ७० हून अधिक मुंबईकरांनी हरकती सूचना द्वारे आपले मत मांडले आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्प येत्या फेब्रुवारीत प्रशासकाकडून सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्यानुसार अनेकांच्या सूचना पालिकेकडे येत आहेत. विविध नागरी सुविधांसाठी लोकप्रतिनिधी, स्थानिकांच्या सूचना अर्थसंकल्पात तरतुदीसाठी महत्त्वाच्या ठरत असल्याने पालिकेकडून सूचनांसाठी आवाहन केले जाते. मुंबईत पार्किंगची समस्या मोठी आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना केल्या जातात. मुंबईत क्रॉफर्ड मार्केट येथील ‘पे अँड पार्क’ कंत्राटदाराकडून जादा शुल्क आकारल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. इतर ठिकाणीही असे प्रकार होत आहेत. कंत्राटदाराने वाहनचालकांकडून जादा शुल्क आकारण्याची ही एक एकमेव घटना नाही. तर सर्व ‘पे अँड पार्क’ लॉटमध्ये अशी प्रकरणे सर्रासपणे सुरू असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी, पालिकेने अशा पार्किंग लॉटमध्ये शुल्क वसूल करण्यासाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करणे आवश्यक आहे. ही डिजिटल पेमेंट प्रणाली फास्ट टॅगसोबत जोडून पारदर्शकपणे शुल्क आकारणी करायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सूचनेचा विचार आगामी अर्थसंकल्पात करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उद्यान फक्त महिलांसाठी राखीव ठेवा

कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील दीपक जोग चौकात उद्यान आहे. हे उद्यान ‘फक्त महिलांसाठी’ राखीव ठेवावे आणि त्याला सुषमा स्वराज महिला उद्यान असे नाव द्यावे, अशी मागणीही भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असूनही, संपूर्ण शहरात महिलांसाठी एकही राखीव उद्यान नाही. लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी राखीव बोगी, बेस्टच्या बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा असतात. उद्याने मात्र फक्त महिलांसाठी राखीव नाहीत. त्यामुळे महिला उद्यानांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in