टॅक्सी-रिक्षा भाड्याचा किमान भाडेटप्पा एक किलोमीटर करा; जनता दलाची मागणी

सर्वसामान्य जनता महागाईने ग्रासली असून त्यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकू लागली आहे; या पार्श्वभूमीवर टॅक्सी व रिक्षा भाड्यात वाढ करण्याची मागणी मान्य करू नये.
टॅक्सी-रिक्षा भाड्याचा किमान भाडेटप्पा एक किलोमीटर करा; जनता दलाची मागणी
Published on

मुंबई : सर्वसामान्य जनता महागाईने ग्रासली असून त्यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकू लागली आहे; या पार्श्वभूमीवर टॅक्सी व रिक्षा भाड्यात वाढ करण्याची मागणी मान्य करू नये. त्याऐवजी प्रवाशांचे हित विचारात घेऊन भाड्याचा पहिला टप्पा दीड किलोमीटरऐवजी एक किलोमीटरने सुरू करावा, अशी मागणी जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाने केली आहे.

याबाबत पक्षाने नमूद केले आहे की, टॅक्सी-रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी चालक-मालकांच्या संघटनानी केली आहे. अलीकडे सीएनजीच्या दरात फार मोठी वाढ झालेली नाही. त्यामुळे भाडेवाढीची मागणी सरकारने मान्य करू नये, असे पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.  

भाडेवाड करताना सरकारकडून नेहमीच प्रवाशांकडे दुर्लक्ष केले. शासकीय यंत्रणांनी कायमच चालक-मालकांना झुकते माप दिले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हिताचाही विचार व्हावा, असे जनता दलाने म्हटले आहे.

पहिला टप्पा एक किलोमीटरचा केल्यास कमी अंतरासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होऊ शकेल. असा टप्पा केल्यास १५ रुपयात रिक्षाने तर तर २० रुपयात टॅक्सीने प्रवास करता येईल, असे नमूद केले आहे.

टॅक्सी, रिक्षासारख्या वाहनांचा वापर वाढण्यासह चालक - मालकांचा व्यवसायही वाढू शकेल. त्यामुळे एक किलोमीटरचा टप्पा करण्याच्या मागणीचा विचार व्हावा, असे मुख्यमंत्री व परिवहनृमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी, महिला आघाडी अध्यक्ष ज्योती बडेकर, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजीवकुमार सदानंद यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in