मुंबई : वस्तूंची किमान गुणवत्ता व दर्जा तपासतानाच, ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने स्वत:चे ‘बीएसआय केअर मोबाईल ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या वस्तूंचा केवळ दर्जाच तपासता येणार नाही, तर त्यासंबंधी ऑनलाईन तक्रार करून आपल्या समस्यांचेही निराकरण करता येईल, अशी माहिती भारतीय मानक ब्युरोचे विभागीय संचालक संजय गोस्वामी यांनी आज दिली. दैनिक नवशक्ति व दि फ्री प्रेस जर्नल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
बीएसआय केअर ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या वस्तूंच्या निर्मिती प्रक्रियेविषयीची संपूर्ण माहिती मिळते. आपल्या वस्तूंच्या दर्जाविषयीची पडताळणी तुम्ही ऑनलाईन करू शकता. प्रसंगी तक्रार करून आपल्या समस्यांचे निराकरण करू शकता. त्यामुळे बीएसआय केअर ॲपचा वापर अधिकाधिक ग्राहकांनी करण्याची अपेक्षा गोस्वामी यांनी व्यक्त केली. वस्तूंचा दर्जा व मानकाविषयी जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला असून येत्या सप्टेंबरपर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय मानक ब्युरोच्या कार्याची माहिती देताना ते म्हणाले, ‘आयएसओ’चे भारतीय मानक ब्युरो संस्थापक सदस्य आहेत. मागील चार-पाच वर्षे आम्ही अधिकाधिक वस्तूंना भारतीय मानकाच्या कक्षेत आणत आहोत. हे प्रमाणिकरण प्रत्येक संस्थांनी स्वत:हून अंमलात आणायला हवे.
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबईत दहा प्रयोगशाळा असल्याचे सांगून ते म्हणाले की, ‘ या प्रयोगशाळांमधील चाचण्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सरकार व खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून एकात्मिक प्रयोगशाळा वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जुलै २०२१ पासून सोन्याच्या वस्तूंचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. आमच्या परवान्याशिवाय कोणताही ज्वेलर्स हॉलमार्किंग करू शकत नाही. देशात १,८७, ००० परवानाधारक ज्वेलर्स आहेत. त्यापैकी मुंबईत १२ हजार ज्वेलर्स आहेत. एकट्या मुंबईत २३ टक्के हॉलमाकिंग होत आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, चंदिगडमध्ये आमची विभागीय कार्यालये आहेत. महाराष्ट्रात विभागीय कार्यालयाच्या चार शाखा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, इंजिनिअरिंग, आयुष्यासह सोळा क्षेत्रासाठी आम्ही सेवा देत आहोत. याशिवाय, शिक्षण, विधी, वित्त, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र, माहिती व तंत्रज्ञान, बँकिंग, टुरिझमसह १२ सेवा क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत.’