मालाड आग प्रकरण : चिमुकली आणि आईच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

मायलेकीने क्षणाचाही विलंब न करता घाबरून न जाता रहिवाशांना इमारत रिकामी करण्‍याची सूचना केल्याने मोठा धोका टळला.
मालाड आग प्रकरण : चिमुकली आणि आईच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

मालाड (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी राजे संकुलातील पंचरत्‍न अपार्टमेंटमध्‍ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत एका चिमुकलीच्या सतर्कतेमुळे व अग्निशमन दलाच्या यशस्वी बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. २४ मजली इमारतीच्‍या २३व्‍या मजल्‍यावर एका सदनिकेला आग लागताच या इमारतीत राहणारी अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरडीने प्रसंगावधान राखत आईला धोक्‍याची सूचना दिली. मायलेकीने क्षणाचाही विलंब न करता घाबरून न जाता रहिवाशांना इमारत रिकामी करण्‍याची सूचना केल्याने मोठा धोका टळला.

रविवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्‍या सुमारास 'पंचरत्‍न अपार्टमेंट' या चोवीस मजली इमारतीच्‍या २३ व्‍या मजल्‍यावर एका सदनिकेला अचानक आग लागली. सदनिकेतील लहान मुले आगपेट्यांशी खेळत असताना बिछान्‍याने आणि पदड्यांनी पेट घेतला. वातानुकुलिक यंत्रणा, छताच्‍या प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस (पीओपी) आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडले. खेळत्‍या हवेमुळे सदनिकेतील ज्‍वलनशील साहित्‍याने पेट घ्यायला सुरूवात केली. आग लागताच इमारतीतील धोक्‍याची घंटा देणारा ‘फायर अलार्म’ वाजू लागला. फायर अलार्म ऐकू येताच याच इमारतीच्‍या चौथ्‍या मजल्‍यावर राहणाऱ्या मुग्‍धाने तातडीने आईकडे धाव घेतली. इमारतीत काहीतरी दुर्घटना घडल्‍याचे आईला सांगितले. त्यानंतर मुग्धाच्या आईने खातरजमा केली असता २३व्‍या मजल्‍यावरील सदनिकेला आग लागल्‍याचे त्यांना दिसले.

दरम्यानच्या काळात मीनल यांनी आपल्‍या घराचा विद्युत पुरवठा, गॅस पाईपलाईन पुरवठा तातडीने बंद केला. आजुबाजूच्‍या सदनिकाधारकांनाही आगीची दुर्घटना लक्षात आणून देत त्‍यांनाही विद्युत पुरवठा, गॅस पाईपलाईन पुरवठा बंद करण्‍यास सांगितले. त्यानंतर आपल्या दोन मुलींसह आणि शेजाऱ्यांना घेऊन त्या पायऱ्यांनी इमारतीतून खाली उतरल्या. त्याचबरोबर त्यांनी इमारतीतील इतरांना पाय-यांचाच वापर करण्याचे आणि लिफ्टचा वापर न करण्याचेही सांगितले. याच गृहसंकुलात राहणारे नागरी संरक्षण दलाचे विभागीय क्षेत्राधिकारी गोविंद झा, रहिवासी राज ब्रम्हे यांनी घटनास्थळी धाव घेत लिफ्ट यंत्रणा पूर्णपणे बंद केली. क्षणाचाही विलंब न करता इमारतीतील इतर रहिवाशांना धीर देत आपात्कालीन घटनेवेळी काय करावे आणि काय करू नये याची माहिती देत त्यांना धावाधाव न करता पायऱ्यांवरून शांतपणे खाली उतरविले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in