चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन गुन्हेगारांना अटक

मालवणी येथे सलाम हा त्याच्या सहकाऱ्यासोबत रॉबरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर मालवणी पेालिसांच्या एका विशेष पथकाने परिसरात गस्त सुरू केली होती.
चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन गुन्हेगारांना अटक

मुंबई : चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना मालाड पोलिसांनी अटक केली. सलाम सलीम आलम मोहम्मद जमशेद शेख ऊर्फ पापा पेटली आणि शाजेब शाकीर कुरेशी ऊर्फ साजू अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. मालवणी येथे सलाम हा त्याच्या सहकाऱ्यासोबत रॉबरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर मालवणी पेालिसांच्या एका विशेष पथकाने परिसरात गस्त सुरू केली होती. ही गस्त सुरू असताना मालवणीतील गेट क्रमांक सात, हाथी गार्डनजवळ सलाम हा त्याच्या एका सहकाऱ्यासोबत संशयास्पद फिरताना दिसून आला.

पोलिसांना पाहताच ते दोघेही पळू लागले होते, यावेळी पोलिसांनी पाठलाग करून सलाम शेख आणि त्याचा सहकारी शाजेब कुरेशी या दोघांनाही ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या दोघांनीही ते तिथे चोरीच्या उद्देशाने आल्याचे कबुली दिली. दोन्ही आरोपी मालाडच्या मालवणी परिसरातील रहिवाशी असून, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सलामविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात आठ तर मालाड पोलीस ठाण्यात एक अशा नऊ गुन्ह्यांची, तर साजेबविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात सात, गोरेगाव, मालाड, बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in