Mumbai : मालाडमध्ये शाळेत जादूटोणा; पोलिसांची कारवाई, ७ जणांविरोधात गुन्हा

सांताक्रूझ पूर्व येथील रहिवासी असलेल्या आशा उपाध्याय (४५) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. १० मे रोजी आशा उपाध्याय यांचा मुलगा आदित्य...
Mumbai : मालाडमध्ये शाळेत जादूटोणा; पोलिसांची कारवाई, ७ जणांविरोधात गुन्हा
Published on

मेघा कुचिक/मुंबई

प्रार्थनेने आणि चमत्कारिक उपचारांनी आजार बरे होतात, असा दावा करून अंधश्रद्धा पसरवल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन अनोळखी महिलांचा समावेश असून त्यांच्यावर 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायदा २०१३' च्या कलम ३(२) सह कलम २९९ आणि ३(५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा व अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सांताक्रूझ पूर्व येथील रहिवासी असलेल्या आशा उपाध्याय (४५) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या सात वर्षांपासून त्यांना थायरॉईड आणि रक्तदाबाशी संबंधित आजारांचा त्रास होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ८ मे रोजी उषा गुप्ता नावाची महिला आणि तिच्यासोबत आलेल्या तीन अज्ञात महिलांनी त्यांच्या घरी भेट दिली. प्रार्थनेद्वारे आजार बरे होऊ शकतात, असा दावा करत त्यांनी उपाध्याय यांना मालाड पश्चिम येथील एका खासगी शाळेत दर रविवारी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रार्थना सभेला येण्याचे आमंत्रण दिल्याचा आरोप आहे.

तक्रारदार महिलेने असा आरोप केला आहे की, संबंधित महिलांनी घरात देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नका, असा सल्ला दिला. तसेच प्रार्थना सभेला उपस्थित राहण्याचा आग्रह धरला.

डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्याचा दावा

१० मे रोजी आशा उपाध्याय यांचा मुलगा आदित्य हा संबंधित कार्यक्रमाला (प्रार्थना सभेला) गेला होता. त्यावेळी रमेश गुप्ता नावाचा व्यक्ती लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे आजार बरे करण्याचा दावा करत असल्याचे निदर्शनाला आले. त्याने रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याला मज्जाव केला. तक्रार प्राप्त झाल्यानंतर मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in