रेल्वे स्थानकातील शेडवर मलेरियाचा फैलाव करणाऱ्या डासांच्या अळ्या,कीटकनाशक विभागातर्फे फवारणी

मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकातील शेडवर डासांच्या अळ्यांची उत्पत्तिस्थाने आढळण्याची शक्यता लक्षात घेता शोधमोहीम तीव्र केली
रेल्वे स्थानकातील शेडवर मलेरियाचा फैलाव करणाऱ्या डासांच्या अळ्या,कीटकनाशक विभागातर्फे फवारणी

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, दादर, माहीम परिसरात मलेरिया लेप्टो, गॅस्ट्रो, डेंग्यू या साथीच्या आजारांचा फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या जी उत्तर विभागाने डासांच्या अळ्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत दादर, माहीम, माटुंगा व शीव स्थानकातील शेडवर मलेरियाचा फैलाव होणाऱ्या २१ ठिकाणी डासांच्या अळ्यांची उत्पत्तिस्थाने आढळून आली आहेत.

डासांच्या अळ्यांची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागातर्फे औषध फवारणी सुरू केल्याचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले. त्याशिवाय मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकातील शेडवर डासांच्या अळ्यांची उत्पत्तिस्थाने आढळण्याची शक्यता लक्षात घेता शोधमोहीम तीव्र केली आहे.

पावसाळी आजारांचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने डासांच्या अळ्यांचा शोध घेत कीटकनाशक फवारणीची मोहीम सुरू केली आहे. विशेष करून मलेरिया, डेंग्यू आजारांच्या नियंत्रणासाठी पालिकेने कंबर कसली आहे. इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, गच्चीवर टाकलेले अडगळीचे सामान, झोपडपट्टीमधील पाण्याचे ड्रम, प्लास्टिक ताडपत्रीमध्ये पावसाचे साचलेले पाणी, भंगार वस्तू, बांधकामे इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in