दादर स्थानकात मलेरिया, डेंग्यू घुसला; एडिस, ॲनोफिलीस डासांच्या अळ्या सापडल्या

नागरिकांनाही प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दादर स्थानकात मलेरिया, डेंग्यू घुसला; एडिस, ॲनोफिलीस डासांच्या अळ्या सापडल्या

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा कीटकनाशक विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मलेरिया, डेंग्यूच्या फैलावास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस व ॲनोफिलीस डासांच्या अळ्या चक्क दादर स्थानकात आढळल्या आहेत. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. दरम्यान, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी कीटकनाशक विभागाकडून रेल्वे हद्दीत फवारणी करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनाही प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. नालेसफाई असो वा मान्सूनपूर्व खड्डेमुक्त रस्ते, यासाठी मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, कावीळ, स्वाईन फ्लू या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादूर्भाव उच्चभ्रू वस्त्यांसह झोपडपट्टीत झपाट्याने होत आहे. मलेरिया, डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला जात आहे.

रेल्वे हद्दीतही साथीच्या आजारांचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या जी. उत्तर विभागाने डासांच्या अळ्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत दादर, माहीम, माटुंगा व शीव स्थानकातील शेडवर मलेरिया, डेंग्यूचा फैलाव होण्यास कारणीभूत डासांच्या अळ्यांची उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला जात आहे. यात दादर स्थानकात मलेरियाच्या फैलावास कारणीभूत ॲनोफिलीस डासांची ५ तर डेंग्यूच्या फैलावास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांचे एक उत्पत्तीस्थान आढळून आले. त्यामुळे मुंबईतील रेल्वे हद्दीत साथीच्या आजारांनी पाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकातील शेडवर डासांच्या अळ्यांची उत्पत्तीस्थाने आढळण्याची शक्यता लक्षात घेता, कीटकनाशक विभागाने शोध मोहिम अधिक तीव्र केली आहे.

घर परिसर स्वच्छ ठेवा

पालिकेच्या दादर जी. उत्तर विभागातर्फे दादर, माहीम, माटुंगा व धारावी परिसरात मलेरिया, डेंग्यू नियंत्रणासाठी विविध उपक्रम राबविले जात असून रेल्वे स्थानकांच्या छतावरील पन्हाळींमध्ये साचलेल्या पाण्यावर कीटकनाशक औषधे फवारणी करण्यात येत आहेत. दरम्यान, नागरिकांनी आपल्या घरात, कार्यालयात आणि परिसरात पाणी साचू शकतील, अशी ठिकाणे तत्काळ नष्ट करून पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये फवारणी!

मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू आदी साथीचे आजार पावसाळ्यात पसरतात. मुंबईत पावसाने अद्याप हजेरी लावली नसली तरी साथीचे आजार झपाट्याने पसरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पावसाळी आजारांचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने डासांच्या अळ्यांचा शोध घेत कीटकनाशक फवारणीची मोहीम सुरू केली आहे. इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, टेरेसवर टाकलेले अडगळीचे सामान, झोपडपट्टीमधील पाण्याचे ड्रम, प्लास्टिक ताडपत्रीमध्ये पावसाचे साचलेले पाणी, भंगार वस्तू, बांधकामे इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान डास अळ्या आढळून आल्यास उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येतात किंवा योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in