मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, चिकुनगुनिया आजारांनी मुंबईला विळखा घातला आहे. जुलैच्या दोन आठवड्यांत डेंग्यूचे १६६, मलेरियाचे २८२ तर स्वाईन फ्लूचे ५३ रुग्ण आढळले आहेत, तर गॅस्ट्रोनेही चांगलेच हातपाय पसरले असून तब्बल ६९४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉईड, कॉलरा, कावीळ असे आजार, तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्याने साथीच्या आजारांनीही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. डेंग्यू, मलेरिया नियंत्रणासाठी पालिकेकडून लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. 'भाग मच्छर भाग' ही विशेष जनजागृती मोहीम मराठी, हिंदी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते तसेच सेलिब्रिटी, प्रसिद्ध व्यक्ती यांना सहभागी करून राबवली जाणार आहे. यामध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन करणारा संदेश सेलिब्रिटींकडून व्हिडीओच्या माध्यमातून दिला जाणार आहे. पावसाळी आजारांना आळा घालण्यासाठी मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
१ ते १५ जुलैपर्यंत आढळलेले रुग्ण
मलेरिया - २८२
लेप्टो - ५२
डेंग्यू - १६५
गॅस्ट्रो - ६९४
कावीळ - ७५
स्वाईन फ्लू - ५३
चिकनगुनिया - १
अशी घ्या काळजी : पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, गरज असल्यास पालिकेच्या दवाखान्यात संपर्क करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू असल्यास रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, हात धुवावेत, तर स्वाईन फ्लूपासून बचावासाठी गर्दीत जाऊ नये, शिंकताना-खोकताना नाक-तोंडावर रूमाल धरावा व मास्क वापरावा.