
मुंबई : १९९३ च्या जातीय दंगलीदरम्यान अंधेरीत तिघांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या किसन सोमा साठे याला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत दोषमुक्त केले. पाच जणांच्या कबुली जबाबांना समर्थन देण्यासाठी सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत न्या. मिलिंद जाधव यांनी साठेला खटल्यातून दोषमुक्त केले.
१२ जानेवारी १९९३ रोजी तलवारी, लोखंडी रॉड आणि काठ्या घेऊन १५ जणांनी अंधेरी एमआयडीसी संकुलातील ब्लू स्टील कंपनीच्या आवारात घुसून ऑन ड्युटी असलेले वॉचमन सोहेब खान, त्यांचा मुलगा नौशाद खानवर हल्ला केला होता. त्यात सोहेबचा जागीच मृत्यू झाला, तर नौशादचा त्याच दिवशी संध्याकाळी मृत्यू झाला. तसेच ब्लू स्टील कंपनीच्या आवारात इरफान अन्सारी या दुसऱ्या व्यक्तीवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. अंधेरी एमआयडीसी संकुलातील नोबेल इलेक्ट्रिक कंपनीचे कर्मचारी फिरोज मोहम्मद सुलतान यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी साठेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. साठे याने या खटल्यातून दोषमुक्त करावे अशी विनंती करणारा अर्ज कनिष्ठ न्यायालयात केला होता. तो अर्ज नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यायालयाने फेटाळला. त्या विरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्या अपिलावर न्या. जाधव यांच्या समोर सुनावणी झाली.