
मुंबई : बोगस पावती देऊन हॉल बुकींग करून पैशांचा अपहार करणाऱ्या मॅनेजरला अखेर सात महिन्यानंतर बोरिवली पोलिसांनी अटक केली. जतीन देवेंद्र पटने असे या २९ वर्षांच्या आरोपीचे नाव असून, पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जतीनने आतापर्यंत अनेकांकडून हॉल बुकींगच्या नावाने सहा लाख रुपये घेतले असून, ही रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता पैशांचा अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चेंबूर परिसरात राहणारे नरेश कन्हैयालाल राजवाणी यांचा बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात डिवाईन बॅनक्यूट नावाचे एक हॉटेल आहे. हा हॉल वाढदिवस, लग्न समारंभासह पार्टीसाठी भाड्याने दिला जातो. हॉलच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी कंपनीची ऑनलाईन पोर्टलवर जाहिरात दिली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत तिथे जतीन हा मॅनेजर म्हणून नोकरीस लागला होता. हॉलचे बुकींग करणे, जेवण, डेकोरेशन आणि आर्थिक व्यवहाराची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. २४ ऑगस्टला दिनेश यादव यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी हॉल बुक केला होता. बुकींगदरम्यान त्याने त्यांच्याकडून काही आगाऊ रक्कम घेतली होती. हॉल बुकींगसाठी जतीन हा लोकांकडून पैसे घेत होता. मात्र ती रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा करत नव्हता. हा प्रकार नरेश राजवाणी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याची शहानिशा सुरू केली होती.