'हायराईज' इमारतींना अग्निशमन दल 'सरप्राइज व्हिजिट' करणार; 'या' नियमांचं पालन न केल्यास पाणी-वीज कनेक्शन कापणार

हायराईज इमारतीत आगीच्या घटना टाळण्यासाठी आता अग्निशमन दलाने कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
'हायराईज' इमारतींना अग्निशमन दल 'सरप्राइज व्हिजिट' करणार; 'या' नियमांचं पालन न केल्यास पाणी-वीज कनेक्शन कापणार

मुंबई : गेल्या काही दिवसांत निवासी व व्यवसायिक इमारतीत आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हायराईज इमारतीत आगीच्या घटना टाळण्यासाठी आता अग्निशमन दलाने कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. हायराईज इमारती, सोसायटी आदींना फायर ऑडिट बंधनकारक केले असून, दर सहा महिन्यांनी ऑनलाईन रिपोर्ट सादर करणे अनिवार्य आहे. अग्निशमन दलाच्या सूचनेचे पालन केले की नाही याची तपासणी करण्यासाठी सरप्राइज व्हिजिट करणार असून यात उपाययोजना केल्या नसल्यास संबंधित इमारतीचे पाणी व वीज कनेक्शन कट करण्यात येईल, असा इशारा अग्निशमन दलाने दिला आहे.

आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे. आग लागली, इमारत कोसळली तर पहिला फोन खणखतो तो अग्निशमन दलाचा. विविध दुर्घटनांचे वर्षभरात सुमारे १५ ते २० हजार काॅल येतात. यात सुमारे ३३ टक्के म्हणजे सुमारे पाच हजार कॉल हे आगीच्या दुर्घटनांचे असतात. मुंबईत सद्यस्थितीत इमारती, झोपडपट्टी, आस्थापने मिळून सुमारे ४० लाख प्रॉपर्टीज आहेत. अशा सर्व ठिकाणी पालिकेला पोहोचून ऑडिट करणेही शक्य होत नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाइफ सेफ्टी अ‍ॅक्ट मेजर्स अ‍ॅक्ट २००६’मधील तरतुदीनुसार दरसहा महिन्यांनी सोसायट्यांना फायर ऑडिट रिपोर्ट सादर करावा लागेल.

इलेक्ट्रिकल ऑडिट होण्याची गरज

मुंबईत लागणाऱ्या आगींमध्ये तब्बल ८० टक्के आगी शॉर्टसर्किटने लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोसायट्या, इमारती, आस्थापनांना इलेक्ट्रिक ऑडिट करणे गरजेचे आहे. इमारतींना इलेक्ट्रिक ऑडिटचीही सक्ती करण्याचीही गरज निर्माण झाली आहे. यासाठी पीडब्ल्यूडीसोबत समन्वय साधला जाणार असून इलेक्ट्रिकल सिस्टीमचे ऑडिट केले जाणार असल्याचे समजते.

इमारतीच्या प्रवेशद्वारावर प्रमाणपत्र लावा

संबंधित हाय राईज इमारतीने फायर ऑडिट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट अग्निशमन दलाला ऑनलाईन सादर करावा. तसेच फायर ऑडिट झाल्याचे प्रमाणपत्र इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावावे, असे निर्देश अग्निशमन दलाने हाय राईज इमारती, सोसायट्यांना दिले आहेत.

‘म्हणूनच’ घेतला निर्णय

पालिकेकडे सध्या ९० मीटर उंचीच्या शिड्या आहेत. मात्र शिड्यांनी केवळ १०० मीटरपर्यंत बचावकार्य करणे शक्य असते. मात्र यापेक्षा जास्त उंचीच्या शिडीवर तोल सांभाळण्याच्या दृष्टीने मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे ४५ मीटरवरील इमारींमध्ये स्प्रिंकलर ठेवणे बंधनकार करण्यात आले आहे.

शिवाय अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, यंत्रणा चालवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ ठेवणे, आग धोक्याची सूचना देणारा फलक लावणे व ही सर्व यंत्रणा असलेले प्रमाणपत्र इमारत, आस्थापनाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावणे बंधनकारक राहील. हे प्रमाणपत्र प्रमुख अग्निशमन दल अधिकारी यांना www.mahafireservice.gov.in या वेबसाइटवर सादर करावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in