मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २५ मेपासून बंद; भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा सुरू राहणार

मांडवा-अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई ही प्रवासी जलवाहतूक रविवारपासून (दि. २५ मे) बंद करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. मात्र मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यान चालणारी रो रो सेवा सुरू राहणार आहे.
मुंबई-मांडवा जेट्टी
मुंबई-मांडवा जेट्टी प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

अलिबाग : मांडवा-अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई ही प्रवासी जलवाहतूक रविवारपासून (दि. २५ मे) बंद करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. मात्र मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यान चालणारी रो रो सेवा सुरू राहणार आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते अलिबागमधील मांडवा दरम्यान जलप्रवासी वाहतूक केली जाते. कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक प्रवाश्यांची वर्दळ असणारा हा जलमार्ग म्हणून ओळखला जातो. दररोज साधारणपणे तीन हजार तर सुट्टीच्या दिवशी आठ ते दहा हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात. अलिबागहून दक्षिण मुंबईत अवघ्या दीड तासात पोहोचणे शक्य होते. प्रवासाचा वेळ वाचत असल्याने या जलप्रवासी वाहतूकीला प्रवासी आणि पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते. पावसाळ्यातील चार महिने सोडले तर उर्वरित आठ महिने ही जलप्रवासी सेवा नियमित सुरू असते. पावसाळ्यात समुद्र खळवलेला असतो, त्यामुळे गेट वे ऑफ इंडियाजवळ बोटी लावणे अशक्य असते. त्यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही जलवाहतूक सेवा बंद ठेवली जाते. यावेळी २५ मेपासून जलप्रवासी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

जलवाहतूक सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार

कोकण किनारपट्टीवर सध्या वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदा सहा दिवस आधीच जलप्रवासी वाहतूक बंद केली जाणार आहे. ही जलवाहतूक पुन्हा सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. दरम्यान गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान जलप्रवासी वाहतूक चार महिन्यांसाठी बंद होणार असली तरी भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान चालणारी रो रो सेवा मात्र नियमीत सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या वाहनांसह अलिबागला पोहोचणे शक्य असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in