अलिबाग : गेटवे ऑफ इंडिया, मुंबई ते मांडवा-अलिबाग या लोकप्रिय जलमार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाचा दुवा असलेली मांडवा जेट्टी धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. पुलाच्या खांबांवरील सिमेंट गळून पडल्याने लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे स्पष्ट दिसत असून, जेट्टी कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील महाराष्ट्र सागरी मंडळाकडून या धोक्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवासी आणि पर्यटकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गेल्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जलवाहतूक पुन्हा सुरू झाली असली, तरी जेट्टीची दुरवस्था जसच्या तशीच आहे. मुंबईहून अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हा जलमार्ग वेळ आणि इंधनाची बचत करून आरामदायी प्रवासाचा पर्याय ठरतो.
जेट्टीवरील शेडची पत्रे गंजल्याने ती काढण्यात आली असून, नवीन पत्रे बसविण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना भिजत उभे राहावे लागते, तर उन्हाळ्यात उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच जेट्टीवर मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहने ये-जा करत असल्याने पुलाच्या स्थैर्यावर अधिकच धोका वाढला आहे.