दादरचे खासगी प्राणी संग्रहालय पुन्हा वादात: कारवाईसाठी मनेका गांधींचे CZA ला पत्र; काही परदेशी प्राणी जप्त

दादर शिवाजी पार्क येथील स्विमिंग पूलमध्ये शेजारील खासगी प्राणी संग्रहालयातून मगरीचे पिल्लू शिरले आणि खासगी प्राणी संग्रहालय चर्चेत आले. पालिका विरुद्ध प्राणी संग्रहालय असा वादही पेटला. मात्र काही दिवसांनंतर वाद शमतो न् तोच आता...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील स्विमिंग पूलमध्ये शेजारील खासगी प्राणी संग्रहालयातून मगरीचे पिल्लू शिरले आणि खासगी प्राणी संग्रहालय चर्चेत आले. पालिका विरुद्ध प्राणी संग्रहालय असा वादही पेटला. मात्र काही दिवसांनंतर वाद शमतो न् तोच आता केंद्रीय मंत्री व खासदार मनेका गांधी यांनी या प्रकरणात उडी घेतली असून प्राणी संग्रहालयातविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र पालिका व ‘सीझेडए’ला दिले आहे.

शिवाजी पार्क येथील स्वातंत्रवीर सावरकर मार्गावर पालिकेचा जलतरण तलाव असून त्याच्यालगत खासगी प्राणी संग्रहालय आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये जलतरण तलावात मगरीचे पिल्लू सापडल्याने खळबळ उडाली होती. पालिकेने आपल्या सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत, मगरीचे पिल्लू प्राणी संग्रहालयाचेच असल्याचे स्पष्ट करत वनखात्याकडे तक्रार केली होती. पालिकेच्या जी. उत्तर विभागाने तातडीने पावले उचलत सहा अवैध बांधकामे पाडली. दरम्यान, प्राणी संग्रहालयाच्या मालकाने चार महिन्यांपूर्वी प्राणी संग्रहालयातून प्राणी चोरीला गेल्याचा दावा करत गुन्हा नोंदविल्याचे आता समोर आले आहे.

वनखात्याच्या पथकाने गेल्या आठवड्यात या प्राणी संग्रहालयातून एक सॉफ्टशेल कासव, दोन अर्जेंटाइन ब्लॅक अँड व्हाइट टेगू, एक बॉल पायथन, एक आफ्रिकन बॉल पायथन आणि एक सामान्य स्नॅपिंग कासव ताब्यात घेतले आहे. परवानगीशिवाय ठेवण्यात आलेले हे प्राणी कसे मिळाले, याची कागदपत्रे आणि तपशील प्राणी संग्रहालय मालकाकडून मागितले आहेत, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

वन विभागाकडून लवकरच अहवाल

हे प्राणी संग्रहालय बेकायदेशीरपणे चालवले जात असून त्यास कोणतीही मान्यता नाही. प्राणी अतिशय वाईट अवस्थेत ठेवले जातात. तसेच त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. प्राणी संग्रहालयातून अनेक प्राणी चोरीला गेले आहेत. या प्राणी संग्रहालयाला सीझेडएची मान्यता नाही. या प्रकरणी आम्ही मुख्य वन्यजीव विभागाकडून अहवाल मागवला असून तो लवकरच मिळणे अपेक्षित आहे, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in