मुंबई : मुंबईत पावसाळ्यात गटारांची झाकणे उघडण्यास पालिकेची बंदी असतानाही गुरुवारी (ता.८) सायंकाळी बोरिवली- पश्चिमेला एका हाॅटेलच्या मालकाने मॅनहोलचे झाकण खासगी कामगारांकरवी उघडले. परिणामी एक कामगाराचा त्यात पडून त्याचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे सफाई कामगारांच्या जीवितर क्षणासोबत मॅनहोलच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आला. शिवाय खासगी व्यक्तींंनी विनापरवाना केलेल्या अशा उपद्व्यापांमुळे महापालिकेला न्यायालयांकरवी लाखो रुपये दंडाचा फटका बसत आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
पालिका क्षेत्रातील मलनिसारण वाहिन्यांवर मॅनहोल असतात. सांडपाणी, मैला वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची साफसफाई यांत्रिक पद्धतीने करावी, असा नियम आहे. मात्र अनेकदा या वाहिन्यांची सफाई करण्यासाठी त्यात कामगार उतरविले जातात. त्यात अनेकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे.
पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बोरिवलीत गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिंपोली रस्त्यावर हे काम सुरू होते. तेथील ताराचंद हाॅटेलची मलवाहिनी साफ करण्यासाठी हाॅटेल मालकाने खासगी कामगार लावले होते. त्यांच्याकरवी मॅनहोलचे झाकण उघडून हे काम सुरू होते. त्याचवेळी मूळचा बुलडाण्याचा सुनील वाकोडे हा ३५ वर्षीय कामगार मॅनहोलमध्ये पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला मॅनहोलबाहेर काढून कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
यांत्रिक पद्धतीनेच सफाईचे नियम
पावसाळ्यात गटारांची झाकणे उघडण्यास पालिकेने बंदी घातली आहे. तसे आदेश न्यायालयानेच दिले होते. बोरिवलीतील ताज्या प्रकरणात हाॅटेल मालकाने बळेच मॅनहोल उघडले होते, त्याला परवानगी नव्हती, असे पालिकेचे म्हणणे आहे. पण, याबाबत हाॅटेल मालकावर कोणती कारवाई करणार, याचे सूतोवाच अधिकारी करू शकले नाहीत. दरम्यान, हा कामगार साफसफाई करताना मॅनहोलमध्ये पडला, की त्याला सफाईसाठी आत उतरविण्यात आले होते, याची चौकशी होण्याची गरज आहे, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
दंड मात्र पालिकेला
मालाड येथे गेल्या वर्षी सांडपाणी वाहिनीची सफाई करताना तीन जणांचा मृत्यू झाला होता. स्थानिक रहिवाशाकडून हे काम सुरू होते. विशेष म्हणजे या प्रकरणात खासगी व्यक्तींनी हे काम केले असताना आणि त्याला पालिकेची कोणतीही संमती नसतानाही सर्वोच्च न्यायालयाने मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुमारे ३० लाख रुपये याप्रमाणे सुमारे ९० लाख रुपये भरपाई देण्यास पालिकेला सांगितले होते. बोरिवलीचे प्रकरणही पालिकेवर शेकणार काय, अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे.