मानखुर्दमधील १४०० झोपड्या जमीनदोस्त; २२ एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त; BMC व जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई

गोवंडी-मानखुर्द परिसरातील सुमारे २२ एकर सरकारी जमिनीवर उभारण्यात आलेल्या सुमारे १४०० झोपड्या बुधवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. मुंबई महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्त कारवाई करत या बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम राबवली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मानखुर्दमधील १४०० झोपड्या जमीनदोस्त; २२ एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त; BMC व जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई
मानखुर्दमधील १४०० झोपड्या जमीनदोस्त; २२ एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त; BMC व जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई
Published on

मुंबई : गोवंडी-मानखुर्द परिसरातील सुमारे २२ एकर सरकारी जमिनीवर उभारण्यात आलेल्या सुमारे १४०० झोपड्या बुधवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. मुंबई महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्त कारवाई करत या बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम राबवली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मानखुर्द शिवाजीनगर येथील २२ एकर जमिनीवरील बेकायदा बांधकामांवर बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली होती. संबंधित जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असून या भूखंडावर पूर्वी विविध प्रकल्पांसाठी आरक्षण टाकण्यात आले होते. काही काळ येथे साबण निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव होता, तर अलीकडे या ठिकाणी बाजारपेठ आणि उद्यान विकसित करण्याचा विचार करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानेही आदेश दिले होते. मात्र, याठिकाणी असलेल्या बेकायदा झोपड्या विकासकामात अडथळा ठरत होत्या.

अखेर बुधवारी १४०० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार घटनास्थळी उपस्थित होते. तसेच पोलीस उपायुक्त (परिमंडळ ६) समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण कारवाई शांततेत पूर्ण झाली.

कुर्ला तालुक्यातील सर्व्हे क्रमांक १/२ (भाग) या सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. हे अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना निर्देश दिले होते. या मोहिमेत अपर जिल्हाधिकारी (पूर्व उपनगर), उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पालिकेचे सहाय्यक आयुक्त (एम/पूर्व), कुर्ला तहसीलदार, सहाय्यक पोलीस आयुक्त, मानखुर्द पोलीस ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह सुमारे ४०० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

या कारवाईदरम्यान ७ जेसीबी आणि ३ पॉकलेन मशीनच्या सहाय्याने १४०० हून अधिक झोपड्या हटवून २२ एकर जमीन मोकळी करण्यात आली असून उर्वरित अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तोडक कारवाईदरम्यान मानखुर्दकडून येणाऱ्या मार्गावर वाहतुकीत बदल करून काही मार्ग एकमार्गी करण्यात आले होते.

मोकळ्या जमिनीवर 'विज्ञान पार्क'

मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मानखुर्द येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथे सरकारी जमिनीवर असलेल्या अनधिकृत तब्बल १४०० झोपड्यांवर पालिकेचा हातोडा पडला. या निष्कासित जागेवर आता नागरिकांसाठी 'विज्ञान पार्क ' उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला अधिक सुरक्षित, सुविधाजनक आणि सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने सहपालकमंत्री या नात्याने कब्जा केलेल्या सरकारी जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. मुंबईला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पडताळणी करुन सरकारी जमिनी ताब्यात घेतल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

विधायक उपक्रम राबवणार

मुंबई आणि उपनगर मिळून हजारो एकर सरकारी जमिनींवर अनधिकृत बांधकामे असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. या सर्व जमिनींवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून पुन्हा त्या जमिनी सरकारच्या ताब्यात आणण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी निवडक अतिक्रमणमुक्त ५०० एकर जमिनींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात विधायक उपक्रम राबवण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in