मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, जीटीबी नगर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार १३० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च

४५ ते ५५ हजार प्रवासी येथून प्रवास करतात
मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, जीटीबी नगर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार १३० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च

मुंबई : हार्बर मार्गावरील मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, जीटीबी नगर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ठरवले आहे. यासाठी १३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याची निविदा प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एमआरव्हीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी म्हणाले की, या चार रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. त्याचबरोबर अतिरिक्त एफओबी, उन्नत डेक्स, स्कायवॉकला जोडणी, स्टॉल्स, किओस्कमध्ये फेरबदल आदी सुधारणा केल्या जातील. स्थानकांत प्रवाशांचे येण्याचे आणि जाण्याचे मार्ग मोठे केले जातील. तसेच झाडे लावून स्थानकाभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येईल.

जीटीबी नगर रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूला पूर्व-पश्चिम दिशेने जोडणारा विशेष डेक उभारला जाईल. रस्त्याला जोडणाऱ्या पुलाला उन्नत बुकिंग ऑफीस उभारण्यात येईल. नवीन होम फलाट २७५ मीटर लांबीचा असून १० मीटर रुंद असेल. तर सध्याचा फलाट ७५ मीटर उत्तरेकडे वाढवला जाईल. या भागात पार्किंग विभाग उभारला जाईल. रेल्वेची काही कार्यालये अन्यत्र हलवली जातील.

ही रेल्वे स्थानके अत्यंत महत्वाची आहेत. रोज ४५ ते ५५ हजार प्रवासी येथून प्रवास करतात. या स्थानकावर रोज ४२५ ते ४३० ट्रेन धावतात. या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केल्यानंतर प्रवाशांना चांगला फायदा होईल.

logo
marathi.freepressjournal.in