

मुंबई : पूर्व उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर सबवे परिसरातील ‘टी’ जंक्शनवर सायन–पनवेल महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. मात्र उड्डाणपुलाच्या कामात टाटा पॉवरचे १३ टॉवर अडथळा ठरत असल्याने टॉवरची उंची ३१ मीटरने वाढवण्यात येणार आहे.
विद्युत टॉवरची उंची वाढवण्याच्या कामावर महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाची नजर असणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिका ६९ कोटी ८४ लाख ५९ हजार ९७० रुपये खर्च करणार आहे.
मानखुर्द-सायन पनवेल महामार्गावरील फ्लायओव्हरच्या आर्म-१ आणि आर्म-२ च्या प्रस्तावित बांधकामाला गती देण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनाच्या २२० केव्ही उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवरचे स्थलांतर तसेच उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. एकूण १३ उच्च दाबाच्या विद्यमान टॉवरची उंची वाढवून ती ३१ मीटर करण्यात येणार आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या बांधकामात कोणताही तांत्रिक अडथळा येणार नाही. तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचा प्रवास सुरक्षितत होणार आहे.
महापालिकेच्या नियोजनानुसार, सायन-पनवेल महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्रनगर सबवे परिसरातील ‘टी’ जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मात्र, फ्लायओव्हरच्या मार्गात येणाऱ्या २२० केव्ही विद्युत वाहिन्यांमुळे बांधकामास अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे संबंधित टॉवरचे अपवाहन, आवश्यक तेथे स्थलांतर आणि उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कामामुळे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांपासून आवश्यक सुरक्षित अंतर राखले जाईल. परिणामी भविष्यात फ्लायओव्हरवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कोणताही धोका निर्माण होणार नाही.