मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.
मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर जोशी यांना यापूर्वी ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, गुरुवारी पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने हिंदुजा ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.

मनोहर जोशी यांना याआधी म्हणजेच २४ मे २०२३ रोजी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता परत एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत. मनोहर जोशी सध्या ८६ वर्षांचे आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. १९७६ ते १९७७ या काळात त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले, तर १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in