आता सरकारशी चर्चा नाही! मनोज जरांगे पाटील यांची घोषणा : मुंबईतील आंदोलन अटळ

मनोज जरांगेंचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा मांडला मुद्दा
आता सरकारशी चर्चा नाही! मनोज जरांगे पाटील यांची घोषणा : मुंबईतील आंदोलन अटळ

विशेष प्रतिनिधी/मुंबई

मराठा आरक्षणासाठी खंबीरपणे लढा देणारे मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी आता सरकारशी चर्चा करणार नसल्याची घोषणा केली. काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासनच दिले. त्यापेक्षा वेगळे काही बोलले नाहीत. तेव्हा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा मुद्दा मांडला. मात्र, या बैठकीतूनही काही नवा तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आता जरांगे पाटील यांनी सरकारशी बोलणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन अटळ असल्याचे मानले जात आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी थेट मुंबईत धडकण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी बुधवारी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील आंदोलकांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी आता सरकारशी बोलणी करणार नाही, असे घोषित केले. माझ्यासह मुंबईकरदेखील आता सरकारशी चर्चा करणार नाहीत, असे ते म्हणाले. त्यामुळे राज्य सरकारसाठी हा धक्का मानला जात आहे. कारण मराठा आंदोलक मुंबईत धडकू नयेत, यासाठी सरकार प्रयत्नशील होते. मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेली बैठक त्याचाच एक भाग होता. मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून त्यांनी राज्य सरकारने २० जानेवारीपर्यंत जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो घ्यावा, असे सांगून टाकले आहे. मात्र, आता सरकारशी बोलणी करायची नाही, असे घोषित केल्याने सरकारची चांगलीच गोची झाली आहे. कारण बोलणीच होणार नसेल, तर सरकार आता यावर तोडगा कसा काढणार, हा प्रश्न आहे. आता आपण ठरल्याप्रमाणे २० जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहोत. तब्बल २ कोटी मराठा बांधव मुंबईत धडकतील. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी मुंबईकरांची आहे, असेही यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितले. मुंबई येथे आंदोलन करण्यासाठी दीड लाख स्वयंसेवक तयार करण्यात येत आहेत. यामध्ये २०० वकिलांची टीम असणार आहे. तसेच १५०० डॉक्टर सेवेला असणार आहेत. विशेष म्हणजे दीड महिन्याचे अन्न सोबत घेऊन जाणार आहोत. राज्यभरातून आंदोलक मोठ्या संख्येने येणार आहेत. मात्र, रस्त्याने येताना कुठेही पिकाचे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

समाजाशी गद्दारी करणार नाही

माझ्यासाठी समाज महत्त्वाचा आहे. तसेच समाजाचे हित महत्त्वाचे आहे. त्यासाठी माझा मनापासून प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांसोबत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतदेखील कुठलीही गुप्तता ठेवली नाही. उलट जनतेसमोरच उघड संवाद साधला. मराठा समाजाला आता एवढीच संधी आहे. आता फक्त एका शब्दावर अडकले आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला सोडायची नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

सगेसोयऱ्याचा चुकीचा अर्थ काढला

सरकार कुणबी नोंदी शोधत आहे. मात्र, काही अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. दरम्यान, ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, या सगेसोयऱ्याचा गैर अर्थ काढला असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in