

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाची तयारी चालवली असताना राज्य सरकारने दक्षिण मुंबईतील आंदोलनांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार दक्षिण मुंबईत आंदोलनांसाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही आंदोलनाला फक्त एकाच दिवसासाठी परवानगी राहणार आहे.
आंदोलनाला केवळ शासकीय कामकाजाच्या दिवशीच मुभा देण्यात आली आहे. शनिवार, रविवार किंवा शासकीय सुटीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी मिळणार नाही. तसेच आंदोलन सकाळी ९ ते संध्याकाळी ६ यावेळेतच पुकारता येईल, असे निर्बंध घालण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी जरांगे-पाटील यांनी केलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईचा परिसर ठप्प झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने सरकारला सुनावले होते. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांच्या संभाव्य आंदोलनाने मुंबईत गेल्या वर्षीच्या स्थितीची पुनरावृत्ती नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत मंगळवारी राजपत्र जारी करण्यात आले असून जाहीर सभा, मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धरणे यांना नियम लागू करण्यात आले आहेत.
सामान्य नागरिकांना आणि वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा, आणि आंदोलकांना शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करता यावे, यासाठी हे नियम लाग करण्यात आले आहेत. तसेच आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबई अन्य कुठेही आंदोलन, धरणे किंवा मोर्चे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. आझाद मैदानातील आंदोलनासाठी चतु:सीमा निश्चित करण्यात आली असून पश्चिमेकडे बॉम्बे जिमखाना मैदान, पूर्वेकडे मुंबई महापालिका मुख्यालय, दक्षिणेकडे हजारीमल सोमाणी मार्ग आणि उत्तरेकडे मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्राची सीमा निश्चित करण्यात आली आहे.
मोर्चावर बंदी
आझाद मैदानाकडे येणारा किंवा तिथून बाहेर जाणारा कोणताही मोर्चा काढता येणार नाही. आंदोलकांना थेट मैदानावरच शांततेत जमायचे आहे आणि तिथूनच बाहेर पडायचे आहे. आंदोलनात ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल-रिक्षा, हातगाड्या, जड वाहने तसेच घोडे, हत्ती, उंट यांसारखे प्राणी/पक्षी आणण्यास सक्त मनाई कण्यात आली आहे.
कारवाईचा इशारा
आक्षेपार्ह व्हिडीओ/ऑडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करणे, आत्मदहन, आत्महत्येचा प्रयत्न किंवा आमरण उपोषण करणे, पुतळे, कागदपत्रे किंवा पुस्तके जाळणे, आंदोलनस्थळी अन्न शिजवणे किंवा कचरा टाकणे, रस्ते किंवा पदपथ अडवण्यास मनाई करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान सार्वजनिक किंवा सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्यास किंवा जाळपोळ झाल्यास त्याची संपूर्ण भरपाई आयोजकांकडून आणि सहभागी व्यक्तींकडून वसूल केली जाणार आहे.
लाऊडस्पीकर वापरता येणार नाही
याशिवाय आंदोलकांना पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वापरता येणार नाही. परवानगी मिळाल्यास ध्वनिप्रदूषण नियमांनुसार विहित डेसिबल मर्यादेतच लाऊडस्पीकरचा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे आंदोलनासाठी वापरण्याच्या झेंड्याचा आकारही निश्चित करण्यात आला आहे. मैदानावर पक्के किंवा तात्पुरते तंबू, मंडप उभारण्यास सक्त मनाई करण्यात आली असून लाठ्या, तलवारी, बंदुका, भाले किंवा इतर कोणतीही घातक शस्त्रे जवळ बाळगणे, भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
सायंकाळी ६ वाजेपर्यंतच परवानगी
आंदोलनासाठी एका दिवसाची मुदत घालून देताना आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच निर्धारित करण्यात आली आहे. संध्याकाळी सहानंतर आझाद मैदान पूर्णपणे रिकामे करावे लागेल. त्यानंतर थांबणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. एका वेळी जास्तीत जास्त पाच हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची मुभा असेल.
सात दिवस आधी परवानगी, सुट्टीच्या दिवशी आंदोलन नाही
आंदोलनाच्या परवानगीसाठी किमान ७ दिवस आधी परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे (पदनिर्देशित अधिकारी) किमान ७ दिवस अगोदर हमीपत्रासह अर्ज करावा लागणार आहे. परवानगी देताना आधी अर्ज करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. आंदोलन केवळ एकावेळी एका दिवसासाठी आणि फक्त शासकीय कामकाजाच्या दिवशीच करता येईल. विधिमंडळ अधिवेशन, व्हीव्हीआयपी/व्हीआयपी दौरे, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन किंवा सुरक्षेच्या कारणास्तव आंदोलनाला परवानगी नाकारण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे.