

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेची आगामी सर्वसाधारण सभा येत्या शुक्रवारी, दि. २० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत प्रभाग समित्यांच्या रचनेसह एकूण ३९ विषयांवर चर्चा होणार आहे. मात्र, या यादीतील अत्यंत महत्त्वाच्या प्रभाग समिती रचनेचा सविस्तर 'गोषवारा' प्रशासनाने जाणीवपूर्वक दडवून ठेवल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केला आहे.
सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि प्रशासनाने संगनमत करून भाजप नगरसेवकांना अंधारात ठेवण्यासाठी हा राजकीय डाव आखल्याचा दावा त्यांनी केला. नगरसचिवांनी इतर सर्व विषयांची माहिती सदस्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली असली, तरी केवळ प्रभाग समिती रचनेचा तपशील लपविण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. प्रभागांची भौगोलिक रचना जाणून घेण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी आणि जनतेला असतानाही ही माहिती दडविणे म्हणजे लोकशाही मूल्यांची पायमल्ली असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपाला किमान तीन ठिकाणी प्रभाग समितीचे सभापतीपद मिळण्याची शक्यता असून, ते टाळण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून हा कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला.
विरोधाचा इशारा
नियमांना डावलून प्रभाग रचना मंजूर करण्याचा प्रयत्न झाल्यास हा विषय सर्वसाधारण सभेत कोणत्याही परिस्थितीत चर्चेला येऊ देणार नाही, असा सज्जड दम मनोज पाटील यांनी भरला आहे. पारदर्शक कारभार न झाल्यास या प्रक्रियेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि आवश्यक असल्यास कायदेशीर लढा उभारून सदर ठराव रद्द करण्यासाठी राज्य स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.