मंत्रालयाशेजारील नव्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गंडांतर? नवी इमारत पाचऐवजी चार मजल्यांची होण्याची शक्यता

मंत्रालयाच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या खिडकीतून दिसणारा दक्षिण मुंबईचा प्रशस्त नजारा पाहताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मंत्रालय शेजारी बांधण्यात येत असलेल्या नव्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या खिडकीतून दिसणारा दक्षिण मुंबईचा प्रशस्त नजारा पाहताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मंत्रालय शेजारी बांधण्यात येत असलेल्या नव्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. नव्या इमारतीच्या पाचव्या मजल्यामुळे मंत्रालय इमारतीला बाहेरचा 'व्ह्यू' मिळणार नाही. त्यामुळे नव्या इमारतीचा एक मजला कमी करण्याचे घाटत आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी निवडक पत्रकारांशी बोलताना दिली.

मंत्रालयातील जागेच्या अडचणीमुळे मंत्री कार्यालयांना सध्या सोयीची जागा उपलब्ध नाही. याशिवाय जागा कमी पडत असल्याने मंत्र्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंत्रालय मुख्य इमारतीला लागून नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला सात मजली इमारत बांधण्याचे नियोजन होते. मात्र, हेरिटेज समितीचा आक्षेप आणि सर्वोच्च न्यायालयाने मंत्रालय परिसरातील इमारतींना घालून दिलेली २४ मीटर उंचीची मर्यादा यामुळे नवी इमारत पाच मजली बांधण्याचा निर्णय झाला.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची दालने आहेत. याशिवाय सचिवांची सुद्धा कार्यालये आहेत. येथून समुद्रकिनाऱ्याचा व्ह्यू दिसतो. नवी इमारतीचा पाचवा मजला हा 'व्ह्यू' साठी अडथळा ठरत आहे. त्यामुळे नवी इमारत पाच ऐवजी आता चार मजल्याची इमारत बांधावी, असे सरकारच्या विचाराधीन आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नसल्याने चार मजल्यापर्यंत बांधकाम करण्याचे नियोजन केले जात आहे.

एप्रिलपर्यंत बांधकाम पूर्ण

मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात बांधकाम विभागाला मंत्र्यांसाठी इमारत बांधण्याचे लक्ष्य दिले. त्यासाठी कार्यारंभ आदेश १ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आला. मात्र, अनेक अडचणी आल्याने इमारत बांधून पूर्ण झाली नाही. आता ३० एप्रिलपर्यंत बांधकाम पूर्ण करून महाराष्ट्रदिनी इमारतीचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे.

नवीन मंत्रालय इमारतीचे वैशिष्ट्य

  • ११० कोटी खर्चून प्री इंजिनिअरिंग इमारत, नव्या इमारतीचे बाह्यस्वरूप मंत्रालय इमारतीशी सुसंगत

  • इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चार मंत्री दालने आणि मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यालय

  • मंत्र्यांना शासकीय बैठका घेण्यासाठी प्रत्येक मजल्यावर बैठक कक्ष

  • तळ मजल्यावर नागरिकांसाठी चहापानाची सुविधा असलेले कॉफी हाऊस

logo
marathi.freepressjournal.in