मुंबई : देश- विदेशातील पर्यटकांचे कपडे खरेदीचे केंद्र असलेले फॅशन स्ट्रीट गेले तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच दुकानांमधील कामगारांना फटका बसत आहे. दुसरीकडे मराठा आंदोलक मुंबईतील विविध ठिकाणी खरेदी करू लागले आहेत.
चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकादरम्यान असलेले फॅशन स्ट्रीट पर्यटकांच्या खरेदीसाठी ओळखले जाते. परंतु हे मार्केट मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे.
तसेच या दुकानांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना याचा फटका बसू लागला आहे. मजुरांना दिवसाला दोन वेळचे जेवण, चहा पाणी याचा खर्च सुमारे ३०० रुपयांचा आहे. येथे शेकडो कामगार काम करत असून त्यांना आर्थिक फटका बसू लागला असल्याचे एका कामगाराने सांगितले.
मराठा आंदोलनामुळे हे मार्केट बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्याप्रमाणे मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. मार्केट बंद ठेवल्याने मजुरांना बऱ्याच दिवसांनंतर आराम मिळाल्याचेही एका कामगाराने सांगितले.
विविध ठिकाणी आंदोलकांची खरेदी
फॅशन स्ट्रीट बंद असल्याने आंदोलक मुंबईतील विविध ठिकाणी खरेदी करू लागले आहेत. सीएसएमटी स्थानकाजवळील सबवे, चर्चगेट सबवे आणि स्टेशन जवळील पदपथावर असलेल्या विक्रेत्यांकडून आंदोलक विविध वस्तू खरेदी करत आहेत.